नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाचे विवरण भरण्याचे नवीन पोर्टल इन्फोसिस कंपनीने गेल्या पंधरवड्यात उपलब्ध केले आहे. मात्र पहिल्या दिवसापासून या पोर्टलवर काम करताना करदात्यांना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी सोडविण्यासंदर्भात अर्थ मंत्रालयातील अधिकारी आणि इन्फोसिस कंपनीचे अधिकारी आज मंगळवारी चर्चा करणार आहेत.
गेल्या पंधरा दिवसात देशभरातील बऱ्याच करदात्यांनी या संदर्भात आपल्या अडचणी अर्थ मंत्रालयाकडे पाठविल्या आहेत. या पोर्टलवर व्यवस्थित काम करता यावे या संदर्भात कंपनी उपाययोजना करीत आहे असे कंपनीने म्हटले आहे.
या विषयावर गेल्या आठवड्यात इन्फोसिस कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही चर्चा झाली. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यचालन अधिकारी प्रवीण राव यांनी सांगितले की करदात्यांच्या अडचणी आम्हाला समजल्या आहेत. त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या पोर्टलवरून आतापर्यंत एक लाख कर्जदात्यांनी विवरण सादर केले आहे. विवरण सादर करण्यासाठी लागणारा कालावधी कमी करणे हा नव्या पोर्टलचा उद्देश होता. मात्र यासंदर्भात अनेक अडचणी येत असल्यामुळे बऱ्याच करदात्यांना काम करता येत नाही.
काही कर सल्लागारांनी जुनी व्यवस्था काही काळ चालू ठेवावी, दरम्यानच्या काळामध्ये नवी व्यवस्था तांत्रिक दृष्टया सुसज्ज करण्यात यावी अशी सूचना केली आहे. ईन्फोसिसला 2019 मध्ये हे पोर्टल तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले होते.
स्वतः अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी हे पोर्टल लवकरात लवकर व्यवस्थित चालु व्हावे यासाठी इन्फोसिस कंपनीला सूचना दिलेल्या आहेत. मात्र त्यानंतरही या पोर्टलवर काम करताना अडचणी येत असल्याचे कर सल्लागारानी सांगितले.