करोना बाधितांच्या आकडेवारीचा पुण्यात ‘टेक्निकल’ गोंधळ

प्रत्यक्षात 7 हजार जणच बाधित आकडेवारीत 15 हजार

पुणे- शहरात होम क्वांरटाइन करण्यात आलेल्या व्यक्तींची माहिती अपडेट करण्यात येणार आहे. करोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना खासगी रुग्णालये उपचारासाठी घरी पाठवतात. मात्र, त्यानंतर या व्यक्ती बरे झाल्यानंतर त्याची माहिती पालिकेस कळवली जात नाही. त्यामुळे या बाधितांचा आकडा 15 हजारांवर दिसत असून प्रत्यक्षात 7 हजार बाधित सक्रीय आहेत.

ही बाब लक्षात घेऊन या व्यक्तींची माहिती तातडीने “अपडेट’ करण्यात येणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी याबाबत पालिकेच्या सर्व परिमंडळ उपायुक्त तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी हे आदेश देण्यात आले.

लक्षणे नसलेल्या करोना बाधितांना घरीच विलगीकरणास केंद्र शासनाने मुभा दिली आहे. त्यानुसार शहरातील अनेक खासगी रुग्णालये या निर्णयाची अंमलबजावणी करत आहेत. पण, खासगी हॉस्पिटल्स पालिकेस न कळवता अनेक बाधितांना घरी उपचारासाठी सोडतात. दहा दिवसांनी असे व्यक्ती करोनामुक्त झाल्यानंतर त्यांची माहिती हॉस्पिटलने अपडेट करावी, यासाठी पालिकेने मोबाइल ऍपही उपलब्ध करून दिले आहे.

मात्र, काही मोजकीच हॉस्पिटल ही माहिती अपडेट करत आहेत. परिणामी, शहरात घरीच विलगीकरणात असलेल्या बाधितांचा आकडा 15 हजार दाखवत आहे. तर प्रत्यक्षात 7 हजारच बाधित शहरात असल्याचा पालिकेचा दावा आहे. त्यामुळे तातडीने ही माहिती अपडेट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.