नवी दिल्ली – शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा करणे, त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणे याबाबी निषेधार्ह आहेत, अशी प्रतिक्रिया लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली.
सरकारकडे मागण्या मांडण्यासाठी, व्यथा व्यक्त करण्यासाठी शेतकरी दिल्लीत येऊ इच्छितात. त्यांच्या मागण्या, समस्या सरकारने गांभीर्याने ऐकायला हव्यात. आज देशात प्रत्येक तासाला एक शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. त्यातून शेतकऱ्यांच्या यातनांचा अंदाज येऊ शकतो.
सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे याआधी आंदोलनावेळी ७०० हून अधिक शेतकऱ्यांना हौतात्म्य पत्करावे लागले. ते देश विसरलेला नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणतो आणि त्यांच्या मागण्यांचे समर्थन करतो. जेव्हा अन्नदाता (शेतकरी) संपन्न होईल; तेव्हाच देश संपन्न होईल, असे भाष्य राहुल यांनी सोशल मीडियावरून केले.