पोलिसांचे साकडे
पुणे – शिवाजीनगर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील सर्वच उड्डाणपूल पाडावेत, अशी मागणी पोलीस प्रशासनाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. दरम्यान, महापालिकेने निर्णय घ्यावा, अशा सूचना पवार यांनी आयुक्त शेखर गायकवाड यांना केल्या आहेत.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गासह विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलासह, ई-स्क्वेअर चित्रपटगृहासमोरील पूलही पाडला जाणार आहे. मात्र, आता पोलिसांनीच कृषी महाविद्यालय चौकातील पूल पाडण्याचीही मागणी केल्याने हा रस्ताच उड्डाणपूल मुक्त होण्याची शक्यता आहे. विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल लॉकडाऊनमध्ये पाडण्याची मागणी या मार्गावर मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीने पीएमआरडीएकडे केली होती. त्यावेळीच ई-स्क्वेअरसमोरील पूलही पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र, हे पूल पाडताना कृषी महाविद्यालयासमोरील पूलही पाडावा, अशी भूमिका वाहतूक पोलिसांनी घेतली. मात्र, मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीने हा पूल दुहेरी असून तो पाडण्याची गरज नसल्याचे सूचित केले. मात्र, येथून मेट्रोचा मार्ग सरळ ठेवायचा असल्यास, तो पूलही पाडावा अशी पोलिसांची मागणी आहे.