#INDvNZ 3rd T20 : भारताचा न्यूझीलंडवर ‘सुपर’ विजय; मालिकाही जिंकली

हॅमिल्टन : भारत-न्यूझीलंड दरम्यान झालेल्या तिस-या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला असून पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजयी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा सामन्याचा मानकरी ठरला.

अतितटीच्या झालेल्या या सामन्यात निर्धारित 20-20 षटकानंतर बरोबरी झाली. त्यामुळे या सामन्यात सुपर ओव्हर झाली. सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना केन विल्यमसनच्या ११(४) आणि मार्टिन गप्टिलच्या ५(२) धावांच्या जोरावर बिनबाद १७ धावा करत भारतासमोर १८ धावांचे आव्हान ठेवले होते. सुपर ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहाने गोलंदाजी केली.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघासमोर १८ धावांचे आव्हान होते. भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने फलंदाजी केली. यावेळी भारतीय संघाने पहिल्या ४ चेंडूत ८ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला शेवटच्या २ चेंडूत १० धावांची आवश्यकता होती. त्यावेळी स्ट्राईकवर असलेल्या रोहितने दोन्ही चेंडूवर षटकार लगावत भारताला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडकडून सुपर ओव्हरमध्ये  टिम साउदीने गोलंदाजी केली.

https://twitter.com/ICC/status/1222473230469996544?s=19

तत्पूर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ५ बाद १७९ अशी मजल मारत न्यूझीलंड समोर १८० धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघाकडून रोहित शर्माने ४० चेंडूत (६ चौकार व ३ षटकार) सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली. त्यानंतर तिस-या क्रमांकावर फलंदाजीस आलेला शिवम दुबे खास कामगिरी करू शकला नाही. तो ३ धावा काढून बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीने ३८(२७), श्रेयस अय्यरने १७(१६) धावा केल्या. त्यानंतर मनीष पांडेने ६ चेंडूत नाबाद १४ आणि रवींद्र जडेजाने ५ चेंडूत नाबाद १० धावा करत २० षटकांत संघाची धावसंख्या १७९ वर नेली. न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजीत हेमिश बेनेटने ४ षटकात ५४ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. मिचेल सैटनर आणि ईश सोढीने प्रत्येकी १ गडी बाद केला.

त्यानंतर विजयासाठी १८० धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघालाही निर्धारित २० षटकात ६ बाद १७९ धावासंख्येपर्यतच मजल मारता आली आणि सामना टाय झाला. न्यूझीलंडकडून फंलदाजीत कर्णधार केन विल्यमसनने ४८ चेंडूत (८ चौकार व ६ षटकार) ९५ आणि मार्टिन गप्टिलने २१ चेंडूत (२ चौकार व ३ षटकार) ३१ धावांची खेळी केली. भारताकडून गोलंदाजीत शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी २ गडी बाद केले तर युजवेंद चहल आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी १ गडी बाद केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.