नवी दिल्ली : भारतीय संघ येत्या रविवारपासून श्रीलंकेविरूध्द तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण भारताच्या जसप्रीत बुमराहसह भुवनेश्वर कुमारही दुखापतीने बेजार झाला असून आता याच यादीत गोलंदाज दीपक चहरचेही नाव समाविष्ट झाले आहे.
वेस्ट इंडिजच्या भारत दौ-यात कटक येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात दीपकला पाठदुखीचा त्रास जाणवू लागला होता, तपासणीनंतर त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला वैदयकीय तज्ञ्ज्ञांनी दिला आहे. त्याच्या जागी संघात नवोदीत गोलंदाज नवदीप सैनीची भारतीय संघात निवड करण्यात आली. या दुखापतीमुळे दीपक चहर श्रीलंका, आॅस्ट्रेलिया आणि भारताच्या न्यूझीलंड दौ-यात खेळू शकणार नाही.
दरम्यान, चहर याने बांगलादेशविरूध्दच्या मालिकेतील तिस-या टी-२० क्रिकेट सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती, अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला होता. याशिवाय याच सामन्यात त्यांन ३.२ षटकांत अवघ्या ७ धावा देत ६ विकेट घेत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ गोलंदाजीचा विक्रम केला होता. तर नवदीप सैनीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात पदार्पणातच चमकदार कामगिरी करत विंडीजचे ३ फलंदाज बाद करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. तसेच याच टी-२० मध्ये भारताकडून २० वे षटक निर्धाव टाकणारा सैनी हा पहिला गोलंदाज ठरला होता.