ब्रिस्टल – इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने भारतीय महिला क्रिकेट संघाचा तिसऱ्या व अखेरच्या टी-20 सामन्यांत 7 गडी राखून पराभव केला व तीन सामन्यांची ही मालिका 2-1 अशी जिंकली. इंग्लंडची सोफी एक्केलस्टोन सामन्याची तर सोफिया डन्कले मालिकेची मानकरी ठरली.
#TeamIndia fought hard but it was England who won the third T20I to win the series 2-1. #ENGvIND
Scorecard ▶️ https://t.co/kRDuI8uFlA pic.twitter.com/PqOXzzwH9s
— BCCI Women (@BCCIWomen) September 15, 2022
इंग्लंडची कर्णधार ऍमी जोन्सने नाणेफेक जिंकत भारताला पहिल्यांदा फलंदाजी दिली. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ केवळ 122 धावाच करू शकला. यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोषने सर्वाधिक 33 धावा केल्या. तसेच दीप्ती शर्माने 24 तर, पूजा वस्त्रकारने आक्रमक 19 धावांची नाबाद खेळी केल्याने संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून 122 असा शतकी पल्ला पार करता आला. इंग्लंडकडून सोफी एक्केलस्टोनने 3 तर साराह ग्लेनने 2 गडी बाद केले.
विजयासाठी आवश्यक धावा इंग्लंडने 18.2 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पार केले व या सामन्यासह मालिकाही जिंकली. इंग्लंडची सलामीवीर फलंदाज सोफिया डन्कलेने 49 धावांची खेळी केली. तिला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. मात्र, तिने डॅनियल वॅटच्या साथीत संघाचा 70 धावांची भक्कम सलामी देताना विजयाचा पाया रचला. त्यानंतर ऍलिस कॅप्सीने नाबाद 38 धावांची खेळी केली व संघाचा विजय साकार केला. तिला साथ देताना ब्रोनी स्मिथने नाबाद 13 धावांची खेळी केली.
भारताकडून राधा यादव, पूजा वस्त्रकार व स्नेह राणा यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला. तीन टी-20 सामन्यांची ही मालिका यजमान इंग्लंडने 2-1 अशी जिंकली. आता या दोन संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना येत्या रविवारी होव्ह येथे होणार आहे. दुसरा सामना 21 रोजी सेंटरबरीत तर, तिसरा व अखेरचा सामना 24 रोजी ऐतिहासिक लॉर्डसवर होणार आहे.