दुबई – सलामीवीर इशान किशन व लोकेश राहुल यांच्या घणाघाती फलंदाजीनंतर ऋषभ पंत व हार्दिक पंड्याने केलेल्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेदरम्यानच्या सराव सामन्यात इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 188 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताच्या राहुल व किशन जोडीने 9 व्या षटकातच 82 धावांची सलामी दिली. राहुल 24 चंडूत 6 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 51 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांनी निराशा केली. मात्र, पंतने डाव सावरला.
किशनने अर्धशतक थाटात पूर्ण केले. मात्र, त्याचवेळी त्याला चेंडू लागल्याने मैदान सोडावे लागले. त्याने आपल्या 70 धावांच्या खेळीत 46 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी केली. त्यानंतर पंतने हार्दिक पंड्याच्या साथीत विजय साकार केला. पंत 29 तर, पंड्या 12 धावांवर नाबाद राहिले.
इंग्लंडकडून लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड विली व मार्क वुड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. जॉनी बेअरस्टो व मोईन अली यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने 20 षटकांत 5 बाद 188 धावा केल्या. बेअरस्टो आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. त्याने आपल्या 49 धावांच्या खेळीत 36 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार फटकावला.
लियाम लिव्हिंगस्टोननेही 30 धावांची उपयुक्त खेळी केली. मात्र, त्यानंतर मोईन अलीने भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवताना नाबाद 43 धावांची खेळी केली. त्यात त्याने 20 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी केली.
संक्षिप्त धावफलक –
इंग्लंड – 20 षटकांत 5 बाद 188 धावा. (जॉनी बेअरस्टो 49, लियाम लिव्हिंगस्टोन 30, मोईन अली नाबाद 43, महंमद शमी 3-40, जसप्रीत बुमराह 1-26, राहुल चहर 1-43). भारत – 19 षटकांत 3 बाद 192 धावा. (लोकेश राहुल 51, इशान किशन जखमी निवृत्त 70, ऋषभ पंत नाबाद 29, हार्दिक पंड्या नाबाद 12, लियाम लिव्हिंगस्टोन 1-10, डेव्हिड विली 1-16, मार्क वुड 1-22).