चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. उद्यापासून म्हणजेच 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे तर भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध होणार आहे. टीम इंडिया डोळ्यात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न घेऊन दुबईला रवाना झाली आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारताचा दुबईमधील रेकॉर्ड कसा आहे? त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…
टीम इंडियाचा दुबईमधील रेकॉर्ड
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये रोहितच्या संघाला रोखणे कोणत्याही विरोधी संघासाठी सोप्पे नसणार आहे. कारण दुबईमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्डचं तसा आहे. टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळायचे आहेत.भारतीय संघाने दुबईमध्ये आतापर्यंत एकूण सहा सामने खेळले आहेत, ज्यापैकी एकाही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेला नाही. टीम इंडियाने पाच सामने जिंकले आहेत आणि एक सामना बरोबरीत सुटला आहे. जर टीम इंडियाची ही कामगिरी कायम राहिली तर नक्कीच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू शकते.
भारत पाकिस्तानविरुद्ध अजिंक्य
भारतीय संघ आतापर्यंत दुबईच्या मैदानावर पाकिस्तानबरोबर 2 सामने खेळला आहे. हे दोन्ही सामने रोहितच्या संघाने जिंकले आहेत. याचा अर्थ असा की या मैदानावर टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध अजिंक्य राहिली आहे. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध अजिंक्य राहण्याचा प्रयत्न करेल.