#CWC19 : भारतीय संघास मोठा धक्का, शिखर धवन विश्वचषक स्पर्धेमधून बाहेर

लंडन – भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज शिखर धवन हा अंगठ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यामुळं भारतीय संघास मोठा धक्का बसला आहे. शिखर धवन याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यास फ्रॅक्‍चर असल्याचे निष्पन्न झाले असून दुखापतीमुळे त्याला विश्वचषक स्पर्धेतून माघार घ्यावी लागत आहे. त्याच्याजागी आता ऋषभ पंत याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाविरूध्द झालेल्या सामन्यात त्याने तडाखेबाज शतक टोलविले होते.त्याने 109 चेंडूत 117 धावा केल्या होत्या. त्यामुळेच भारताला 50 षटकांमध्ये साडेतीनशे धावांचा पल्ला ओलांडता आला होता. याच सामन्यात नॅथन कोल्टिअर नील याचा उसळता चेंडू त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयावर जोरात बसला. त्यामुळे त्याला संपूर्ण वेळ क्षेत्ररक्षण करता आले नव्हते. त्याच्या जागी रवींद्र जडेजा याने क्षेत्ररक्षणाची जबाबदारी सांभाळली होती.

त्यानंतर संघाचे फिजिओ पॅट्रिक फऱ्हार्ट यांनी धवनच्या दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला आणखी दोन सामने खेळता येणार नाही असा सल्ला दिला आहे. त्यामुळे धवन हा न्यूझीलंड व पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यांमध्ये तो खेळू शकला नव्हता.

भारताचा सलामीवीर शिखर धवन जायबंदी झाल्यानंतर विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. भारत-पाकिस्तान संघांमधील सामन्यापूर्वी भारतीय संघाने कसून सराव केला. या सरावात ऋषभही सहभागी झाला होता. मात्र त्यांच्या निवडीची घोषणा झाली नव्हती. मात्र शिखर धवनची दुखापत गंभीर असल्याचे निष्पन्न झाल्याने ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×