पुणे – राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (स्टार) या जागतिक बॅंक अर्थसहाय्यित केंद्र पुरस्कृत प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. यातून पूर्व प्राथमिक ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व आनंददायी शिक्षण देता येणार आहे.
महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, ओडीसा, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ या राज्यातील कामगिरीच्या आधारे प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. समग्र शिक्षा अभियान कार्यक्रमाखाली पूर्व प्राथमिक ते बारावी या वर्गामध्ये दर्जेदार शिक्षण देणे आणि अध्ययन निष्पत्तीमध्ये वाढ करणे, शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीत सुधारणा, मूल्यामापन पद्धतीत सुधारणा याबाबींचा समावेश सर्व पातळीवर करून शिक्षण क्षेत्रात मूलभूत सुधारणा करणे हे स्टार प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. इयत्ता सहावीपासून व्यवसाय शिक्षणाचे अपग्रेडेशन करणे यांचा अंतर्भाव या योजनेखाली करण्यात आला आहे. या प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पामध्ये प्रगती श्रेणीकरण दर्शकानुसार विविध बांबीवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.
शाळाबाह्य मुले, विशेष गरजा असणारी बालके, मुली व वंचित समुदायातील विद्यार्थी यांच्यावर विशेष लक्ष देऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यात येणार आहे. अध्ययन पद्धतीत सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करणे. प्रत्येक मुलाच्या शैक्षणिक पातळीनुसार गरजा निश्चित करून त्यानुसार त्याला ठराविक शैक्षणिक पातळीवर आणणे व त्याचे संनियंत्रण करावे लागणार आहे. शिक्षकांची उपस्थिती, पारदर्शक निवड, नियुक्ती व बदल पद्धती, शाळांचे व शिक्षकांचे नियमित पर्यवेक्षण व तपासणी या सर्व बाबींचे संगणकीकरण करणे, शिक्षकांच्या सेवापुस्तकांचे तसेच शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.
जिल्हास्तरावर प्रकल्पाच्या निरीक्षणाची कामे जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याद्वारे करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा शिक्षण समितीचे प्रमुख असणार आहेत. जिल्ह्याचा प्रकल्प विषयक वार्षिक कृती आराखडा तयार करणे, अर्थसंकल्प तयार करणे व प्रकल्पाची भौतिक व आर्थिक प्रगतीवर देखरेख ठेवणे आदी कामे समितीमार्फतच होणार आहेत.