पुणे – शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतांच्या 150 प्रस्तावांवर पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून ऑक्टोबरमध्ये कार्यवाही होणार आहे. यामुळे शिक्षकांना निर्णयासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
काही अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची भरती करण्यात आली. मात्र, त्यांनी वैयक्तिक मान्यता घेतल्या नव्हता. त्यांना वैयक्तिक मान्यता देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी अनेकदा केली. त्याची दखल घेत शिक्षकांना प्रस्ताव सादर करण्यासाठी संधी देण्यात आली. यासाठी आयोजित शिबिरात पुणे, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यांतून शिक्षकांचे प्रस्ताव दाखल झाले.
लॉकडाऊनमुळे कार्यालयांचे कामकाज थंडावले होते. आता सुरळीत होत आहे. 4 मे रोजी वित्त विभागाने नवीन पदभरतीस बंदी घातली होती. त्यामुळे या प्रस्तावावरील कामकाजास स्थगिती देण्यात आली. मात्र त्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कार्यवाहीच्या सूचना मिळाल्याने प्रस्ताव सप्टेंबरमध्येच मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून संघटनांना देण्यात आले. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही. पुढील महिन्यात प्रस्तावांची तपासणी करून त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक पदाची प्रभारी सूत्रे अनुराधा ओक यांच्याकडे आहे. मात्र, त्या रजेवर असल्याने शिक्षण आयुक्त कार्यालयातील शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांच्याकडे या विभागीय कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार आहे. आता लवकरच पदोन्नतीने या विभागीय कार्यालयाला पूर्णवेळ शिक्षण उपसंचालक मिळणार आहे. त्यानंतर कार्यालयातील कामकाजाला गती येईल.