शिक्षकांनाही मिळणार विमा कवच

आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्यांची दखल

सातारा  -करोनाच्या पार्श्‍वभूमीवर आपत्ती निवारणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण सर्वेक्षण, पोलीस मित्र, अन्नधान्य वितरणावर निरीक्षक, विलगीकरण कक्षात व्यवस्थापकासह अनेक बाबींसाठी करोना योद्धा म्हणून इतर कर्मचाऱ्यांसह शिक्षक काम करत होते. आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा संरक्षण शासनाने मान्य केल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दीपक भुजबळ यांनी दिली. शिक्षक संघाने शासनाकडे ही मागणी केली होती.

आरोग्य कर्मचाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांना शासनाने विमा संरक्षण दिले होते. परंतु, शिक्षकांना विमा संरक्षण देण्यात आले नव्हते. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली होती. आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात नियुक्त शिक्षकांना विमा संरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीचा विचार करुन तसेच संघटनांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाने 29 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार शिक्षकांसह आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाखाचे विमा संरक्षण देण्यात आले आहे.

संघटनेच्या मागणीचा विचार करून शासनाने विमा संरक्षण लागू केल्याबद्दल राज्य अध्यक्ष देविदास बसवदे , सचिव कल्याण लवांडे, सहसचिव तथा जिल्हाध्यक्ष दीपक भुजबळ, सरचिटणीस उद्धव पवार, संघाचे नेते गणेश जाधव, उपाध्यक्ष कृष्णत हिरवळे, राज्य संघटक रजनी चव्हाण, शहनाज तडसरकर, उपसरचिटणीस बी. वाय. दोडमणी आदींनी शासन निर्णयाचे स्वागत करुन शासनाचे आभार मानले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.