मावळात शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसाठी ऑनलाइन व्याख्यान
कार्ला – विद्यार्थ्यांना त्यांच्या महत्त्वकांशा पूर्ण करण्यासाठी वाट दाखवण्याचे काम हे शिक्षकांचे असून, आत्मनिर्भर भारतासाठी आत्मविश्वास गरजेचा आहे, हा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण डॉ. रघूनाथ माशेलकर यांनी शिक्षकदिनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
पाच सप्टेंबर शिक्षकदिनाचे औचित्य साधत इंद्रायणी विद्या मंदिर संस्था, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, स्नेहवर्धक मंडळ, प्रतीभा इन्स्टिट्यूट व तळेगावमधील सर्व शैक्षणिक संस्था यांच्यावतीने मावळ तालुक्यातील सर्व शिक्षकांसाठी झूमऍप व फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून पद्मविभूषण डॉ रघूनाथ माशेलकर यांचे ऑनलाइन व्याख्यान ठेवण्यात आले होते. हे मार्गदशन करताना डॉ. माशेलकर यांनी हे मत व्यक्त केले.
दरवर्षी पाच सप्टेंबर हा शिक्षकदिन या शैक्षणिक संस्था आपल्या संस्थेतील सर्व शिक्षकांचा सन्मान करत असतात. यावर्षी करोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने शाळा, महाविद्यालय बंद असून, ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. या काळात शिक्षकांना मार्गदर्शन व्हावे यासाठी आज दहा वाजता ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या ऑनलाइन कार्यक्रमात एक हजार शिक्षकांनी तर अनेक जणांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या व्याख्यानाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून शिक्षणमहर्षी माजी आमदार कृष्णराव भेगडे, त्रिदल (पुणे) संस्थापक सतीश देसाई, लायन्स माजी पुणे जिल्हा प्रांतपाल राजेंद्र मुच्छाल उपस्थित होते.
माशेलकर म्हणाले की, बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षण पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. म्हणजेच डिजिटल शिक्षणतंत्राचा वापर करणे आवश्यक आहे. शिक्षकदिन हा रोज असावा व शिक्षकदिन हा भविष्य दिन म्हणून देखील ओळखावा, असे मत व्यक्त केले. या वेळी अनेक शिक्षकांनी रघूनाथ माशेलकर यांना शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्न विचारले या सर्व प्रश्नाचे निरासन या व्याख्यानात केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक इंद्रायणी विद्यामंदिराचे कार्यवाह रामदास काकडे यांनी केले. सूत्रसंचालन शैलेश शहा केले. राजेश म्हस्के यांनी आभार मानले. मावळ तालुक्यातीन अधिकाधिक शिक्षकांपर्यंत पोहचावा. हे व्याख्यान ऐकावे, यासाठी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे व संचालक महेशभाई शहा यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे संयोजन प्रकल्पप्रमुख शैलेश शहा, सहप्रकल्प प्रमुख राजेश म्हस्के, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी केले होते.