नांदेड – नांदेड येथील एका विद्यार्थीनीवर शाळेतील 2 शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आले. हा प्रकार नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडला. या घटनेला 2 महिने उलटले असून पीडित मुलीची प्रकृती बिघडल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकरनगर येथील एका नामांकित शाळेत पिडीत मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकते. 2 महिन्यांपूर्वी आरोपी शिक्षक रसूल सय्यद आणि दयानंद राजुळे यांनी मुलीला सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्हिडिओ दाखवतो म्हणून शाळेतील एका खोलीत नेले. मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर दोघांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणाची तक्रार पीडितेच्या आईने शाळा प्रशासनाकडे केली होती. पण विधवा असलेल्या मातेला दबाव टाकून परत पाठवण्यात आले. दरम्यान, बदनामीच्या भीतीने आई गप्प बसली. परंतु काही दिवसांपासून मुलीची प्रकृती बिघडली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत माहिती मिळाल्यावर ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांनी आवाज उठवला आणि त्यानंतर रामतीर्थ पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.