पुणे – महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृति समितीद्वारे राज्यातील शिक्षकांनी वेतन अनुदानासाठी स्वत:च्या घरी राहूनच बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. याची दखल घेऊन शासनाने 1 एप्रिल 2019 पासूनचे वेतन अनुदान देण्याबाबतचे आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
राज्य मंत्रिमंडळाने 28 ऑगस्ट 2019 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार शाळांना अनुदान देणे गरजेचे आहे. विधी मंडळाच्या अधिवेशनात त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आलेली आहे. मात्र, अद्यापही अनुदान वितरणाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिक्षकांना कुटुंबांचा उदरनिर्वाह करणेही कठीण बनले आहे. आंदोलनाचे गांभीर्य लक्षात त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे.