पुसेगाव (प्रतिनिधी) -लॉकडाऊनच्या काळात जात्यावरील ओव्यांची परंपरा जपण्यासाठी तुपेवाडी येथील शिक्षिका प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागात जात्यावर भल्या पहाटे दळण दळताना पूर्वी मायमाऊली ओव्या गाऊन प्रबोधन करायची. आपल्या सासर- माहेरची महती ओव्यातून प्रकट होत असे. काळानुरूप घरातील दळणाची जाती लुप्त पावली व त्याबरोबर ओव्या गायनाचा वारसाही. परंतु, समाजात आजही काही घटक आपला हा समृध्द सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम करत आहेत.
तुपेवाडी (ता. खटाव) येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका सौ. आराधना संतोष गुरव ओव्यांचा छंद जोपासत आहेत. “माझी माय ग बाई ग, कशी जात्यात राहते, लेकराच्या सुखापायी, स्वतःला गं भरडते,’ अशा ओव्यांतून स्त्रियांच्या जीवनाचे वर्णन करताना त्यांना त्यांच्या आजी, पणजीकडून मिळालेला वारसा त्या पुुढे चालू ठेवत आहेत. सौ. आराधना गुरव यांचा काव्यसंग्रह प्रसिध्द झाला असून विविध मासिकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. सध्याच्या लॉकडाऊनमुळे मिळालेला वेळ सत्कारणी घालवण्याकरता घरात राहूनसुध्दा आपण नाविन्यपूर्ण उपक्रम राबवू शकतो, अशा प्रयत्नांचा आनंद मोठा असतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.