वाकेश्‍वरमध्ये “शिक्षक आपल्या दारी’ उपक्रम

पेठ येथे गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांची धडपड
पेठ (वार्ताहर) – शिक्षक आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत पेठ (ता. आंबेगाव) येथील श्री वाकेश्‍वर विद्यालयातील दहावीच्या वर्गासाठी अध्यपान करणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी यासाठी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालक आणि विद्यार्थ्यांच्या भेटी घेऊन मार्गदर्शन सुरू केल्याची माहिती प्राचार्य अशोक वळसे पाटील यांनी दिली.

पेठ (ता. आंबेगाव) येथील श्री वाकेश्‍वर विद्यालयातील दहावीच्या वर्गातील कोतोरे व आदिवासी ठाकर वस्तीत जाऊन “शिक्षक आपल्या दारी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अनेक मुले दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून विद्यालयात येतात. मात्र, शाळेच्या वेळेव्यतिरिक्त जाऊन वस्तीवर असलेले विद्यार्थी व पालक यांना एकत्र बोलावून त्यांना परीक्षा, निकाल, मुलांच्या घरच्या अडचणी, शाळेत सुटीच्या दिवशी आणि सोमवार ते शुक्रवार दरम्यान गुणवत्ता सुधारअंतर्गत सकाळी आणि शाळा सुटल्यावर असणारे जादा तास, विद्यार्थ्यांचा आहार, आरोग्य व खेळ आणि आवडीविषयी पालकांशी चर्चा करून गणित, इंग्लिश, विज्ञान, समाजशास्त्र या कठीण पातळीच्या विषयाचे पालकांसमवेत गरजेप्रमाणे मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे.

रोज सायंकाळी 5 वाजल्यानंतर व शाळा सुटल्यावर शिक्षक वाड्या वस्त्यांवर ग्रुप ने जात आहेत. दहावीच्या वर्गाला शिकवणारे शिक्षक प्राचार्य अशोक वळसे पाटील यांच्या सुचनेनुसार रोज पेठ परिसरातील वस्तीवर जाऊन शिक्षक हे काम करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.