शालेय शिक्षण विभाग उपसचिव चौधरी यांची सूचना
पुणे – राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून खर्चात काटकसर करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आदी संचालकांना दिल्या आहेत.
राज्यातील विविध भागांत करोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आरोग्य व आर्थिक आपत्तीवर मात करण्यासाठी आर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. त्यादृष्टीने शासनाने काही खर्च पुढे ढकलण्याचे नियोजन केले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे एप्रिलमध्ये अदा करण्यात येणारे वेतन दोन टप्प्यात अदा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील मान्यता प्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक विद्यालये, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महापालिका शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संदर्भात वेतनबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
नवीन परिभाषित अंशदायी वेतन परियोजना लागू असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वत:चे अंशदान व नियोक्त्यांचे अंशदान हे जेवढ्या दिवसांचे वेतन आहरित करण्यात येत आहे तेवढ्याच कालावधीसाठी मर्यादीत कपात करावी लागणार आहे. शालार्थ प्रणालीद्वारे वेतन अदा करताना परिपत्रकातील सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
… यानुसार मिळणार वेतन
पहिल्या टप्प्यात सर्व शिक्षकांना 75 टक्के याप्रमाणे वेतन देण्यात येणार आहे. गट ब मधील शिक्षकांना
50 टक्के वेतन देण्यात येणार आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सद्या ते ज्या पदावर काम करत आहेत त्यानुसार गट “क’ व “ड’ नुसार वेतन अदा करण्यात येणार आहे. अर्धवेळ शिक्षक व शिक्षकेतर, अंशत: अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर आणि शिक्षण सेवकांना सद्या ज्याप्रमाणे वेतन अदा करण्यात येते त्याप्रमाणेचे ते अदा करण्यात येणार आहे.