शिक्षक भरती आणखी लांबणीवर?

करोना आणि संचारबंदीमुळे प्रक्रिया थांबली


12 हजार जागांसाठी पवित्र पोर्टलद्वारे भरतीचे प्रशासनाकडून होते नियोजन

पुणे – करोना व शासनाची परवानगी मिळत नसल्याने पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीत अडथळे येत आहेत. त्यामुळे ती आणखी लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.
राज्यात पारदर्शकपणे शिक्षक भरती व्हावी यासाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित केले. 12 हजार जागांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात मुलाखतीशिवायची गुणवत्तेवर आधारित प्रक्रिया राबवली. यातून 5 हजार 970 उमेदवारांच्या नियुक्‍त्यांसाठी शिफारस करण्यात आली होती. यातील 1 हजार 500 उमेदवार रुजू होऊ शकले नाहीत. माजी सैनिकांच्या जागांसाठी पुरेसे उमेदवार न मिळाल्याने या जागा कन्व्हर्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गाच्या (एसईबीसी) आरक्षणातून शिक्षकांच्या जागा भरण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला होता. त्यावर हा प्रस्ताव कॅबिनेटकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. मात्र, कॅबिनेटकडून अद्याप त्यावर काहीच निर्णय झालेला नाही.

खासगी शाळांमधील शिक्षकांची भरती मुलाखती घेऊन करण्यात येणार आहे. यात 950 खासगी शाळांमधील 3 हजार पदे भरण्यात येणार आहेत. मात्र, करोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही शिक्षक भरती होणे मुष्किल आहे. त्यातच वर्षभरापासून शाळाही बंदच आहेत. त्यामुळे शिक्षक भरती करून करायचे का असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. शिक्षक भरतीबाबत कॅबिनेट काय व कधी निर्णय घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

एनआयसीमार्फत उमेदवारांच्या याद्या तयार करून ठेवण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार भरतीची पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.