पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये 127 शिक्षकांची होणार भरती

आता नाही भासणार शिक्षकांची कमतरता

पालिका शाळांमध्ये 127 शिक्षकांची पोर्टलच्या माध्यमातून होत आहे भरती

शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळंमध्येच 127 शिक्षकांची भरती होणार आहे. शिक्षकांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आपला अर्ज महापालिका शाळेच्या पसंती क्रमांकासह दि. 11 मार्च पासून भरता येणार आहे.

पिंपरी – मागच्या कित्येक दिवसापासून पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांची डोकेदुखी होऊन बसलेल्या शिक्षकांच्या रिक्‍त जागांचा प्रश्‍न आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या शिक्षकांच्या मेगा भरती प्रक्रियेमध्ये महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील 127 शिक्षकांच्या रिक्‍त जागाही भरण्यात येणार आहेत. त्यामुळे, कित्येक वर्षापासून शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बेरोजगार उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक भरती होणार असल्याने शाळांचा रिक्त पदांचा प्रश्‍न देखील सुटणार आहे.

मागील काही वर्षापासून संपूर्ण राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यामुळे, हजारो युवकांचे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नव्हते. अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्‍त असल्याने शिक्षकांवर अतिरिक्‍त ताण होता. मात्र, अशाही स्थितीत शासानाने मागील काही वर्षांपासून शिक्षक भरती सुरु केलेली नव्हती. त्यामुळे अनेकांचे शिक्षक होण्याचे स्वप्न अधांतरी राहिले होते. मात्र, आता मागील आठवड्यात राज्य शासनाने 24 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया जाहीर केली.

तसेच, शिक्षकांची भरती पारदर्शक व्हावी, यासाठी पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इच्छुकांमध्ये अनंदाचे वातावरण पसरले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये ही 127 शिक्षकांच्या रिक्‍त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये मराठी, विज्ञान विषयांच्या 37 शिक्षकांची तर इतर सर्व विषयांचे 90 शिक्षक अशा एकूण 127 शिक्षकांची भरती होणार आहे. त्यानुसार, आता शिक्षक भरतीची प्रक्रिया पहिल्यांदाच पोर्टलद्वारे राबवण्यात येत आहे.

येत्या 11 मार्चपासून आपल्या पसंतीच्या शाळेचा नंबर पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेल्या लॉगिनवरुन उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे. पवित्र पोर्टलमध्ये भरण्यात येणाऱ्या माहितीमध्ये पहिले ते पाचवी, सहावी ते आठवी व नववी ते बारावी असे तीन गट करण्यात आले आहेत. पहिले ते आठवीसाठी शासनाने घेतलेली अभियोग्यता परीक्षा (टीईटी) परीक्षा उतीर्ण होणे आवश्‍यक आहे. पिंपरी महापालिकेच्या प्राथमिक शाळांची भरती असल्याने अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ही परीक्षा उतीर्ण असणे अनिवार्य असणार आहे.

महापालिका शाळांची शिक्षक भरती प्रक्रिया देखील खासगी शिक्षक संस्थाच्या भरती प्रक्रियेबरोबरच राबवण्यात येणार आहे. शिक्षक भरतीवेळी गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी शासनाने हे पाऊल उचलले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर माहिती अपडेट करताना दिलेल्या सूचनांनुसार अर्ज सादर करणे आवश्‍यक आहे. शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवरही संस्थाचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे, यावेळची शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शी होणार, असे प्रथमदर्शनी तरी दिसत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)