प्रेरणादायी : गुणवान विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षिकेचा संस्मरणीय पाडवा

पीएचडीचा अभ्यास सुरु असताना विद्यार्थ्यांना दिली प्रेरणा

– डॉ. सौ. लता भरत पाडेकर, दिघी, पुणे

गुढीपाडवा! अर्थात चैत्र शुध्द प्रतिपदा. शक कालगणनेनुसार वर्षारंभ दिन! या दिवशी सगळीकडे आनंद, उत्साह आणि विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असते. पण सन 2015 मधील गुढीपाडवा मात्र माझ्या शाळेच्या दृष्टीने फार आठवणीत राहणारा ठरला. ही गोष्ट आहे पुणे महानगरपालिकेतील येरवडा येथील ‘लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक 6 या शाळेतील. 25 जुलै 1993 ला स्थापन झालेल्या या शाळेचे कला-क्रीडा, सूर्यनमस्कार आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेबाबत खूप मोठे योगदान आहे.

तर 2015 साली होणारी सदर परीक्षा ऐन गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 22 मार्चला होणार होती. याच काळात वेतन किंवा प्रमोशनपेक्षा केवळ आपली अभ्यासाची बैठक संशोधनाच्या चौकटीतून अजमावता यावी आणि आजन्म विद्यार्थीदशा अनुभवता यावी हा निर्मळ आणि निरपेक्ष भाव मनात ठेऊन; मी “संत ज्ञानदेवरचित हरिपाठाचा विवेचक अभ्यास’ हा विषय घेऊन Ph.D. करत होते आणि माझ्याकडे इयत्ता सातवीचा वर्ग होता.

एकूण 34 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यासाठी आम्ही इयत्ता सातवीचा शालेय पाठ्यक्रम आणि शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम ऑक्‍टोबरमध्येच पूर्ण करून 1 नोव्हेंबर 2014 पासून प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव सुरू केला होता. शिक्षण विभागाकडून आलेले प्रश्नसंच व पुस्तके यांचाही आधार होता. आत्तापर्यंत केलेल्या सरावावरून अंदाज आला होता की, 34 पैकी किमान 7 ते 8 जण गुणवत्ता यादीत येतील. मग काय 15 विद्यार्थ्यांची Golden Batch व उर्वरित विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी सोप्या प्रश्नांचा भरपूर सराव अशी तारेवरची कसरत सुरू होती.

मात्र काही कसोटी पाहणाऱ्या घटना घडत गेल्या. मेरीटमध्ये येऊ शकणाऱ्या रितिका खाडे हिला कांजण्या आल्या. कोमल भदोरिया हिच्या गळ्याजवळ अचानक खूप गाठी आल्या आणि मान सुजली. लखन कांबळे हा ज्या आत्यांच्या घरी राहत होता त्या अचानक सर्वांसह गावी गेल्या. मानसी चव्हाणचे पितृछत्र लवकरच हरपल्याने तिची आई पिझ्झा हटमध्ये काम करून लेकरांची भूक भागवत होती.

एके दिवशी त्यांची आणि शेजारच्यांची कडाक्‍याची भांडणे झाल्याने काही दिवस मानसीचा शाळेत पत्ताच नव्हता. भानूप्रसाद नक्का या विद्यार्थ्यांची चुलती वारल्याने त्याचे आई-वडील बरेच दिवस गावी गेले होते; आणि भानू व त्याची सहावीची लहान बहीण दोघेच घरी राहत होते; पण नियमित शाळेत येऊनही गावी घडलेल्या घटनेमुळे भानूचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. वर्ग काहिसा अभ्यासापासून दूर जातोय की काय असे आकस्मिक संकट माझ्यावर ओढवले होते. ऐन परीक्षेच्या तोंडावर काही ‘स्कॉलर’ मुले वर्गात नसणे माझ्यासाठी खूपच धक्कादायक होते. पण तरी मी वेळोवेळी जवळपास प्रत्येकाचे वैयक्तिक समुपदेशन करीत राहिले.

त्यातच माझे एक सहकारी स्वतः स्पर्धा परीक्षेला बसलेले असल्यामुळे रजेवर; तर दुसरे सहकारी प्रशासकीय कामात व्यस्त असल्याने माझी चांगलीच भंबेरी उडाली होती. केल्या कष्टावर पाणी पडते की काय असं वाटू लागलं होतं. कारण शिष्यवृत्ती परीक्षा हे एक Team Work असते. नाही म्हणायला गणित विषय शिकवणाऱ्या मॅडम व इतर सारे शिक्षक मदतीला होतेच. पण वर्गशिक्षक या नात्याने माझी जबाबदारी अधिक होती. बरं घरी आल्यानंतर माझे वैयक्तिक वाचन व प्रबंध लेखन चालू ठेवणे हे सुद्धा मला अनिवार्यच होते. रितिका व कोमलचा अभ्यास फोन वरून सुरू होता. त्यांचे पालकही अधूनमधून शाळेत येऊन जात होते. पण लखन मुळातच गरीब आणि ना फोन, ना संपर्क! बाकी विद्यार्थ्यांचा दोन बॅचमध्ये नियमित सराव सुरू होता.

शुक्रवारचा 20 मार्च 2015 हा दिवस उगवला. गुढीपाडव्याच्या आधीचा हा दिवस! रितिका फारच अशक्त बनून तर कोमलला बरे नसूनही दोघीही हसतमुखाने शाळेत हजर झाल्या होत्या. लखनचा अजून पत्ता नव्हता. त्यादिवशी शाळेत शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता. लखनसुद्धा त्याच वेळी शाळेत आला. त्याला पाहून माझ्या जिवात जीव आला. आमचे अधिकारी येऊन शुभेच्छा देऊन गेले. मुख्याध्यापकांसह सर्वांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. शेवटी माझ्या मनात एक विचार आला आणि मी तो बोलून दाखवला, “उद्या गुढीपाडवा असल्याने सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आहेतच; पण आपण वर्षभर तासाला आलो. मग गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उद्या तास नको का?” तशी सर्व मुले आनंदाने ओरडली, “घ्या मॅडम तास…” तो चेहऱ्यावरील आनंद पाहून मुख्याध्यापकांच्या परवानगीने गुढीपाडव्याला तास घेणे नक्की झाले.

एवढे दिवस माझ्या विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनतीने आणि एकाग्रतेने अभ्यास केला होता; पण सुट्टी मिळाली म्हणून विद्यार्थ्यांनी उगीच उन्हातान्हाचे खेळायला जाऊन आजारी पडू नये व काही विघ्न येऊ नयेत ही प्रामाणिक इच्छा! कारण सातवी म्हणजे काही फार मोठे वय नाही आणि पालकांचे हातावरील पोट असल्याने ते घरी राहू शकणार नव्हते. तसा माझाही या हुशार विद्यार्थ्यांमध्ये सदैव जीव अडकलेला; आणि माझ्या घरी सुद्धा पुरणपोळीच्या स्वयंपाकासह वर्षाचा पहिला सण साजरा करायचा होताच की! तसेच पाडव्याच्या दिवशी मला माझ्या Ph.D. च्या कामासाठी सायंकाळी एक मुलाखत घ्यायला पुणे शहरात जायचे होते.

द्विधा मन:स्थितीमध्ये ‘भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ’ ठरले. काहीही झाले तरी आपण सर्व आघाड्या सांभाळायच्या हे ठरलेलेच असे. केवळ प्रसन्न मनाने विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे आणि जिद्दच चिकाटीसह केलेल्या अभ्यासाचे चीज व्हावे या विशुद्ध भावनेने हा सर्व खटाटोप चाललेला होता.
भल्या पहाटे उठून मी आज शुचिर्भूत होऊन सरळ स्वयंपाकाला लागले व बागेतच खूप फुलझाडे, आंबा व कडुलिंबाचे झाड असल्याने पूजा सामग्री गोळा करण्यासाठी फार वेळ गेला नाही. सकाळी साडेसहा वाजता पुरणपोळ्या तयार; तर सात वाजता दारी तोरण, रांगोळ्यांसह गुढी उभारली सुद्धा. आता मी गाडीला किक मारून निघाले. आठ वाजेपर्यंत सर्व जण आज उपस्थित होते. मग काय! कुणी तोरण बांधले तर कुणी छोटीशी रांगोळी काढली. मी फळ्यावर गुढीचे चित्र आणि पाच एकांची सरस्वती काढली. रंगीत खडूंनी जरा सजावट केली आणि फळ्यांच्या मध्यभागी खालील ओळ लिहिली… ‘शिकस्त करू प्रयत्नांची, गुढी उभारी यशाची’

वर्गातील वातावरण एकदम प्रसन्न! मुले खुश! त्यांचा अगदी नूरच पालटला. मलाही हेच हवे होते. सुरवातीला गुढीपाडव्याविषयी थोडी माहिती सांगितली. मग मुलांना विचारले की, “आज आपण कोणता संकल्प करायचा बरं?” तर मुलांनी चक्क घोषणाच दिल्यासारखे सांगितले, “शिकस्त करू प्रयत्नांची, गुढी उभारी यशाची…” वा! किती सुंदर क्षण होता तो! “याचसाठी केला होता अट्टाहास’ वर्गातील माझ्यासह प्रत्येकाच्या नसानसांमध्ये जणू आत्मविश्वास भिनलेला दिसत होता. चेहरे आनंद आणि चैतन्याने फुलले होते. त्याचवेळी मी घरातून नेलेली गाठी तोडली आणि प्रसाद म्हणून सर्वांचे तोंड गोड केले. असा पाडवा साजरा करणे सर्वांसाठीच नवीन होते. प्रत्येकालाच ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली होती.

बस! आता अधिक विषयांतर न करता सर्व विषयांतील म्हणजे मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या सर्व विषयांतील महत्वाचे मुद्दे, सूत्रे, आकृत्या, क्‍लृप्त्या यांची उजळली केली. काही शंकांचे निरसन केले. यावेळी गणिताच्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिकादेखील जातीने उपस्थित असल्याने सर्वांच्याच आनंदाला उधाण आले होते. मग अंगतपंगत झाली. आज विद्यार्थी खरंच खूप खूश होते. कधी एकदा पेपर लिहू असे त्यांना झाले होते. ‘यशाची गुढी उभारायचीच’ या झपाटलेल्या मन:स्थिती मध्ये सारेजण घरी परतलो. सायंकाळी माझी नियोजित मुलाखतही पार पडली. संत साहित्यातून सापडणारी करुणा, सहनशक्ती, निरपेक्ष वृत्ती, मानवतावाद ही मूल्ये अधिक दृढ झाली.

दुसऱ्या दिवशी परीक्षा केंद्रावर सर्वजण वेळेत आणि अत्यंत प्रसन्न मनाने उपस्थित होते. खरंतर ही परीक्षा म्हणजे आमच्या शाळेचा जणू एक सणच असतो. हुश्‍श! मुलांना दोन्हीही पेपर चांगले गेले आणि तो परीक्षोत्सव हर्षोल्हासासह पार पडला. पुढे या मुलांचा निरोप समारंभ आणि वार्षिक परीक्षा वगैरे सर्व सोपस्कार झाले. सुट्ट्या लागल्या. वार्षिक परीक्षेचा निकाल घेऊन ही मुले दुसऱ्या शाळेत इयत्ता आठवीत दाखलही झाली.

जून महिना उजाडला. शाळा सुरू झाली. आणि एक दिवस प्रशासकीय अधिकारी यांचे मार्फत गोड बातमी आली की “शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यानिकेतन क्र. 6 च्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे.” ऑनलाईन निकाल पाहिला. तेव्हा ‘कोमल भदोरिया, रितिका खाडे, लखन कांबळे, गौरी पाटणकर, मानसी कांबळे व भानूप्रसाद नक्का हे असे 6 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले; तर अल्फीया मडकी, शुभानी घाडगे व फैयाज शेख या तिघांचे मेरीट हुकले. बाकी सारे अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाले.’ आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. आम्ही बांधलेला अंदाज अखेर खरा ठरला. संपूर्ण शाळेच्या आनंदाला जणू उधाण आले होते.

लगेच या सर्व गुणवंतांचा शाळेत बोलावून घेऊन छोटासा सत्कार करण्यात आला. पुढे पुणे महानगरपालिकेतर्फेही सर्वांचा यथोचित सन्मान झाला. शिष्यवृत्तीची रक्कमही दरवर्षी खात्यावर जमा होत राहिली. या प्रक्रियेमध्ये पालकांच्या चेहऱ्यावरील भाव किती अवर्णनीय होते हे सांगणे न लगे! पण तरीही विद्यार्थ्यांचे बुद्धिवैभव आणि कष्टाबरोबरच मला मात्र ‘तो गुढीपाडवा’ सुद्धा या यशाचा साक्षीदार वाटतो. खरंच! त्यादिवशी ठरल्याप्रमाणे आज माझ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या जिद्दीने ‘यशाची गुढी’ उभारून शाळेच्या नावलौकिकात भर घातली होती.

पुढे माझे Ph.D. चे काम देखील लवकरच पूर्ण होऊन मलाही ‘विद्यावाचस्पती’ ही पदवी प्राप्त झाली. पुन्हा माझ्याभोवती आणखी एका आनंदाचे कडे पडले. तर असा हा 2015 चा गुढीपाडवा सर्वार्थानेच आनंददायी, आगळावेगळा आणि अविस्मरणीय ठरला. ‘असाध्य ते साध्य करिता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे’ या संतोक्तीप्रमाणे आमच्या केलेल्या कष्टाच्या बळावर ‘यशाची गुढी’ उभारण्याचा संकल्प सिद्धीस नेणारा ठरला. यानिमित्ताने मला असे वाटते की असे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात वारंवार येवोत, इतकेच!

  • डॉ. सौ. लता भरत पाडेकर, दिघी, पुणे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.