औरंगाबाद – वर्गात विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्याने निधन झाल्याची धक्कादायक घटना लासूर स्टेशन परिसरातील जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली आहे. सुरेश निवृत्ती राऊत (वय 43, मुळगाव धोंदलगाव, ता. वैजापूर) असे मृत पावलेल्या शिक्षकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि. 30) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, राऊत हे नेहमीप्रमाणे शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गेले होते. दुपारी जेवण झाल्यानंतर वर्गात शिकवण्यासाठी गेले असता त्यांना भोवळ आली व ते खाली पडले. हे पाहताच विद्यार्थांनी इतर शिक्षकांना ही माहिती दिली. उपचारासाठी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या धक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे.
राऊत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भावजय आणि एक बहीण असा मोठा परिवार आहे. धोंदलगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांना रडू कोसळले होते.
राऊत हे विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक होते. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू असल्याने गावातील सर्व लोकही त्यांना ओळखत होते. ते शिस्तप्रिय होते. कधीही त्यांनी शाळेत जाण्याची वेळ चुकवली नाही. वेळेत शाळेत हजर राहत असत. त्यांच्या हसत खेळत शिकवणीमुळे विद्यार्थ्यांना ते खुप प्रिय होते. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.