खामगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील घटना
यवत – खामगाव (ता. दौंड) येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील एका 13 वर्षीय विद्यार्थ्यास शिक्षकाने वळउठेपर्यंत मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ केल्याने शिक्षकावर यवत पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
सूर्यभान किसन चत्तर असे गुन्हा दाखल केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तर अक्षय बजरंग गवई असे मारहाण केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. खामगाव येथील न्यू इंग्लिश स्कुल शाळेचे शिक्षक चत्तर यांनी बुधवारी (दि.21) दुपारी त्यांच्या वर्गात शिकणाऱ्या 13 वर्षे वयाच्या अक्षय याला मारहाण सुरु केली.
अक्षयने मारहाण का करताय? असे विचारले असता जातीवाचक बोलत, उद्या शाळेत आला तर तुझे पाय मोडीन असे धमकावत काठीने पाठीवर वळ उठेपर्यंत मारले. विद्यार्थी अक्षयचे वडील बजरंग गवई यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याबाबत स्कूलचे मुख्याध्यापक नेवसे यांना विचारणा केली असता हा प्रकार माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक नारायण पवार म्हणाले की, फिर्यादीच्या तक्रारीनुसार, शिक्षकावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.