वेतननिश्चितीसाठी शिक्षकांची एजंटांमार्फत आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप
नगर – सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चिती साठी लेखाधिकारी कार्यालयाकडून शिक्षकांची एजंटांमार्फत आर्थिक लूट चालू असल्याचा आरोप करीत सदरील भ्रष्टाचार त्वरीत थांबविण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने लेखाधिकरी (माध्यमिक) कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षक व विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करण्यासाठी लेखाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ अधिकारी एजंटा मार्फत शिक्षकांकडून पैशाची मागणी करीत आहे. यापुर्वी संघटनेने वेतन निश्चितीसाठी तालुकास्तरावर कॅम्प लावण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र कार्यालय याकडे दुर्लक्ष करीत असून, या भ्रष्टाचारात सदर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
सहाव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करताना तालुकास्तरावर कॅम्प लावण्यात आले होते. त्याप्रमाणे तालुकास्तरावर कॅम्प लावावे, शिक्षकांकडून एजंटा मार्फत चालू असलेला पैसे उकळण्याचा भ्रष्टाचार त्वरीत थांबवावा, अनेक वर्षापासून या कार्यालयात सेवेत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची बदली करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंन्त ठिय्या आंदोलन चालू ठेवण्याचा पवित्रा शिक्षकांनी यावेळी घेतला होता. या आंदोलनात शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, सरचिटणीस आप्पासाहेब शिंदे, राज्याध्यक्ष चांगदेव कडू, एम.एस. लगड, उध्दव गुंड, सुनिल दानवे, बाळासाहेब निवडुंगे, शिरीष टेकाडे, रमाकांत दरेकर, आबासाहेब मुळे, महेंद्र हिंगे, अशोक सोनवणे, अमोल दहातोंडे, अर्जुन भुजबळ, शरद सोनवणे, पारुनाथ ढोकळे, आदी शिक्षक सहभागी झाले होते.