पाकिस्तानमध्ये शिक्षकांना जीन्स, टी-शर्ट घालण्यास बंदी

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये शालेय पातळीवर शिकवणाऱ्या शिक्षकांना जीन्स व टी शर्ट परिधान करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच शिक्षिकांनाही त्यांनी घट्ट कपडे परिधान करू नयेत असे आदेश जारी करण्यात आले आहेत. देशाच्या शिक्षण महासंचालकांनी या बाबतचे पत्र सर्व शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्य यांना पाठवले आहे.

पाकिस्तानमधील शाळांमध्ये शिकवण्याचे काम करणाऱ्या महिलांना जीन्स व टी शर्ट घालण्यात प्रतिबंध करण्यात आला आहेच शिवाय असे काम करणाऱ्या पुरुषांनाही शाळेत जीन्स व टी शर्ट घालता येणार नाहीत अशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

याशिवाय सर्व शिक्षकवर्गाने नियमित काळामध्ये केस कापणे दाढी करणे नखे कापणे आणि स्वछता राखणे आणि अत्तराचा वापर करणे अनिवार्य असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे. महिला शिक्षकांनी सलवार-कमीज दुपट्टा आणि शाल परिधान करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

शाळांमध्ये शिकवताना किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित बैठकींना हजर असतानाही अशाच प्रकारचा ड्रेस कोड सक्तीचा करण्यात आला आहे. पुरुष शिक्षक जर कुर्ता आणि पायजमा परिधान करून शाळेत आले तर त्यांना त्यावर लांब कोट परिधान करावा लागणार आहे. शिक्षिकेची इच्छा असल्यास त्यांनी बुरखा परिधान करावा असेही या अधिसूचनेत म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.