महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या आंदोलनाचा दणका, वेतनाचा प्रश्न सुटला

अखेर नऊ शाळांमधील शिक्षकांच्या वेतनाचा तिढा सुटला

पुणे – पुणे जिल्ह्यातील 20 टक्के अनुदानित असलेल्या नऊ शाळांमधील 130 शिक्षकांचे नियमित वेतन सुरु करावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने प्राथमिक शिक्षण संचालकांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या दणक्‍याने अखेर वेतनाचा तिढा सोडविण्यात आला आहे. यामुळे संबंधित शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या शाळांमधील शिक्षकांना आठ ते नऊ महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. करोनाच्या संकटाच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. या शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक सुनील जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यात एकनाथ आंबले, रणजित बोत्रे, हनुमंत बिनवडे, अतुल शेलार, सुखदेव आंबले, योगेश चव्हाण, नूतन कुदळे, सरिता राऊत, प्रिया गायकवाड, सुनिल पानसरे, रामेश्वर कराड, कैलास कोरडे, प्रवीण चौधरी आदींनी सहभाग घेतला.
प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

वेतनाबाबत ठोस निर्णय होईपर्यंत कार्यालयातून उठणारच नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. तीन तास आंदोलन करुन तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अखेर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी शिक्षण संचालकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून वेतनाचा प्रश्‍न सोडविण्याचा आग्रह धरला. त्यानुसार शिक्षण संचालकानी वेतनाबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.
वेतनाच्या थकीत अनुदानाबाबत शासनस्तरावर पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे. ऑगस्टचे नियमित वेतन देण्याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक यांना देण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले आहे. त्याबाबतच्या आदेशाचे पत्र त्यांनी सुनील जगताप यांना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.