पुणे – पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणी गुरुवारी (दि.3) होत आहे. बालेवाडी येथील क्रीडासंकुल येथे ही मोजणी सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे. पदवीधर मतदारसंघासाठी तब्बल 62 उमेदवार तर शिक्षक मतदारसंघासाठी 35 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत उमेदवारांची मोठी संख्या आणि मतदानाची वाढलेली टक्केवारीमुळे मतमोजणीला 36 तासांहून अधिक वेळ लागू शकतो, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यामुळे अधिकृत निकाल दि. 4 डिसेंबरला पहाटे जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मतमोजणीची आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण झाली आहे.
महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी निवडणूक झाल्याने या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बालेवाडी मतमोजणी केंद्रांवर पदवीधर मतदार संघासाठी 18, तर शिक्षक मतदार संघासाठी 6 हॉल आहेत. त्यानुसार स्वतंत्र सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, प्रत्येक रांगेसाठी अधिकारी नियुक्त आहेत. प्रत्येक हॉलमध्ये 7 टेबल असतील. त्याप्रमाणे पदवीधरसाठी 126 पर्यवेक्षक, 252 सहायक व 126 शिपाई आणि शिक्षक मतदारसंघासाठी 42 पर्यवेक्षक 84 सहायक आणि 42 शिपायांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पदवीधरसाठी एकूण 855 आणि शिक्षक मतदारसंघासाठी 305 अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी 450 पोलीस अधिकारी-कर्मचारी उपलब्ध आहेत.
अशी होणार मतमोजणी
प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीस अवैध व वैध मते ठरविली जातात. बाद मतांची संख्या निश्चित झाल्यानंतर विजयासाठी पहिल्या पसंतीचा मतांचा कोटा जाहीर केला जाणार आहे. पदवीधर मतदारसंघासाठी झालेले मतदान पाहता, पहिल्या पसंतीची सुमारे 1 लाख 22 हजार ते 1 लाख 25 हजार मते मिळालेला उमेदवार विजयी घोषित केला जाणार आहे. तर शिक्षक मतदारसंघासाठी पहिल्या पसंतीची सुमारे 26 हजारांपेक्षा अधिक मते मिळविणारा उमेदवार विजयी घोषीत केला जाणार आहे