“गुंजवणी’त अडथळे आणणारांना धडा शिकवा

सासवड येथे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

सासवड- गुंजवणी प्रकल्पासाठी फक्‍त एक माणूस मागची पाच वर्षे राबला. त्याचे नाव म्हणजे विजय शिवतारे. शिवतारे यांनी अवघ्या 2 वर्षांत धरणाचे काम पूर्ण केले. पाइपलाइनला मंजुरी मिळवली. टेंडर काढले. पण पाइपलाइनचे काम झाले तर आपण पुढची 20 वर्षे आमदार होऊ शकत नाही ही गोष्ट येथील खोडसाळ लोकांच्या लक्षात आली आणि त्यांनी कोर्टबाजीत सरकारची दोन वर्षे घालवली. त्यांचे दावे न्यायालयाने फेटाळले. आता गुंजवणीचे पाणी कोणीच रोखू शकत नाही. पण अशा लोकांना धडा शिकवा आणि शिवतारे यांना पुन्हा विक्रमी मतांनी विधानसभेत पाठवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारासाठी सासवड येथे आयोजित सभेत मुखमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी बाबाराजे जाधवराव, शंकर हरपळे, जालिंदर कामठे, पंडित मोडक, सचिन लंबाते, गंगाराम जगदाळे, श्रीकांत राऊत, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप यादव, संदीप मोडक, कैलास ढोरे, संगीताराजे निंबाळकर, गिरीश जगताप, धनंजय कामठे, केशव कामठे, रवींद्र फुले यांच्यासह असंख्य मतदार उपस्थित होते.

यावेळी संजय जगताप यांनी गुंजवणीत कशा आडकाठ्या आणल्या याचे पुरावे उपस्थित जनसमुदायाला वाटण्यात आले. गावागावांत घरोघरी हे पुरावे वाटले जाणार आहेत. त्यामुळे संजय जगताप त्यांनी संपत्ती दान करण्याचा शब्द पाळणार का? असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.

  • शिवतारेंसाठी कॅबिनेटची शिफारस करणार – मुख्यमंत्री फडणवीस
    विजय शिवतारे यांनी राज्यमंत्री असताना ज्या तडफेने धरणांची व जलयुक्‍त शिवारची कामे केली ती अत्यंत कौतुकास्पद होती. तुम्ही त्यांना उच्चांकी मतांनी निवडून द्या. मी त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस करणार आहे, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी देताच सभेत टाळ्या आणि शिट्ट्यांचा एकच कल्लोळ उडाला.
  • तुमच्यासारखे 56 पाहिलेत – शिवतारे
    मी ज्यावेळेस चाकू चालवेल त्यावेळेस संजय जगताप काय आहे ते कळेल असे वक्‍तव्य संजय जगताप यांनी शिवरी येथील सभेत केले होत. त्याचा संदर्भ देत शिवतारे म्हणाले, मी तुमच्या सारखे 56 पाहिलेत. पुरंदरची जनता सोमवारी (दि. 21) या दादागिरीला उत्तर देईल. गुंजवणीच्या पाण्याशी आणि पुरंदरच्या मातीशी ज्यांनी प्रतारणा केली त्याचा नायनाट इथली जनताच करेल, असे विजय शिवतारे यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.