मुंबई – टीसीएस कंपनीचे संचालक मंडळ 7 ऑक्टोबर रोजी शेअर बायबॅक संदर्भात निर्णय घेणार आहे. त्यामुळे आज या कंपनीच्या शेअरचे भाव 7 टक्क्यांनी वाढले. याचा मुख्य निर्देशांकांनाही आधार मिळाला.
7 नोव्हेंबर रोजी टीसीएस ताळेबंद जाहीर करणार असून यावेळी अंतरिम लाभांश जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. 2018 मध्ये कंपनीने 16 हजार कोटी रुपयांच्या शेअरचे बायबॅक केले होते.
बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 276 अंकांनी म्हणजे 0.71 टक्क्यांनी वाढून 38,973 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 86 अंकांनी वाढून 11,503 अंकांवर बंद झाला.
टीसीएसबरोबरच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या शेअरच्या भावातही जोरदार वाढ झाली. टीसीएसच्या शेअरचा भाव आज 7 टक्क्यांनी वाढल्यामुळे आज या कंपनीचे बाजारमूल्य 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले.
सोमवारी टाटा स्टील, सनफार्मा, इन्फोसिस, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी, एचयूएल या कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढले. मात्र, बजाज फिन्सर्व्ह, भारती एअरटेल, बजाज ऑटो, पॉवर ग्रीड, आयटीसी या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रकृती जास्त चिंताजनक नसल्यामुळे जागतिक शेअरबाजारातूनही सकारात्मक संदेश आले. याचा भारतीय निर्देशांकांना आधार मिळाला.