इस्लामाबाद – दिल्लीतील निझामुद्दीन भागात मर्कजमध्ये सहभागी होऊन करोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढविणाऱ्या तबलिगी जमातने मलेशिया आणि पाकिस्तानातही धुमाकूळ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या दोन्ही देशांमध्ये या तबलिगींमुळे करोनाचे रुग्ण हजारोंच्या संख्येत वाढले असल्याचे दिसून आले आहे. या बेजबाबदार जमातीवर तेथील जनता प्रचंड संतापली असून, जमातीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
दिल्लीतील मर्कजमध्ये सहभागी झाल्यानंतर तबलिकी जमातचे हजारावर लोक भारताच्या इतर राज्यांमध्ये घुसले आणि कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले होते. आता हाच प्रकार मलेशिया आणि पाकिस्तानातही समोर आला आहे. दरम्यान, या लोकांनी अन्य देशांमध्येही अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती आहे.
पाकिस्तानच्या लाहोर प्रांतातील रायविंद शहरात आयोजित तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला सुमारे 80 हजार लोक जमले होते. तर, अनाधिकृत सूत्रांच्या मते, हा आकडा दोन लाखांच्या घरात होता. यात 40 देशांतील तीन हजारावर लोकांचा समावेश होता. हा कार्यक्रम मार्चच्या अखेरीस झाला असून, त्यानंतर या देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्यांपैकी 539 जण आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानमधील सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असून, त्यांनी देशभरातील तबलिगींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
पंजाब प्रांतातील 36 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 10,263 तबलिगींना क्वारन्टाईन करण्यात आले आहे. तसेच हा कार्यक्रम पार पडला ते रायविंद शहर पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. याठिकाणी करोनाचे रुग्ण सापडले आहेत.
पाच हजारावर तबलिगी अडकले
लॉकडाऊनमुळे रायविंदच्या मर्कजमध्ये पाच हजारावर तबलिगी अडकून पडले आहेत. यात तीन हजारावर विदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील करोनाग्रस्तांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 4,196 लोकांना कोरोनाची लागण झाली असून, 60 जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाब पोलिसांच्या मते, जमातचे अनेक मोठे प्रचारकही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले असून, त्यांना क्वारन्टाईन करण्यात आले आहे. याशिवाय, सुमारे 20 हजार जमाती नागरिकांना विशेष मोहीम राबवून विलग करण्यात आले असून, 10 हजारावर लोकांचा शोध सुरू आहे.