नवी दिल्ली – वस्तु आणि सेवाकरचा रोख रकमेच्या स्वरुपात भरणा करावा यासाठी करदात्यांना दूरध्वनी किंवा व्हॉट्सऍप वरून संपर्क करण्यासंबंधी केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने कोणत्याही सूचना दिलेल्या नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
महसूल वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी काही जीएसटी अधिकारी असंवैधानिक पद्धतीने करदात्यांशी संपर्क करत असल्याची कथित माहिती काही माध्यमातून पुढे आली आहे. यानुसार काही वस्तू आणि सेवाकर अधिकारी कथितरित्या दूरध्वनी, व्हॉट्सऍप यासारख्या माध्यमाचा वापर करत करदात्यांना संपर्क करत आहेत. त्यांना रोख स्वरुपात जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा कर भरण्याचे आवाहन करत आहेत. जेणेकरुन महसुलाचे लक्ष्य साध्य होईल.
“जीएसटी’चे अधिकारी अशा तऱ्हेने करदात्यांशी संपर्क साधत असल्याची कथित माहिती माध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हे स्पष्टीकरण दिले आहे. चालू आर्थिक वर्षाचा शेवटचाआ महिना असलेल्या मार्च 2021ची वस्तु आणि सेवाकर थकबाकी भरण्यासाठी करदाते, त्यांच्या पत खात्यात उपलब्ध असलेल्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा, उपयोग करू शकतात असेही सरकारच्या निवेदनात म्हटले आहे.