2007 पूर्वीच्या मिळकतींवर लादली जाणार करवाढ

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून जुन्या आणि नविन मिळकतींना आकारण्यात येणाऱ्या करामध्ये प्रचंड तफावत आहे. ही तफावत दूर करण्यासाठी 1 एप्रिल 2020 पासून 2007 पूर्वीच्या मिळकतींची तपासणी केली जाणार असून त्याचे करयोग्य मूल्य ठरविली जाणार आहे. त्याद्वारे मिळकतकरामध्ये वाढ करण्यात येणार आहे. यापोटी महापालिकेला किमान 150 कोटींहून अधिक उत्पन्न मिळणार असल्याचा दावा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने सन 2007 सालापासून मिळकतींच्या करामध्ये मोठी वाढ केली होती. दरवर्षी ही वाढ कायम आहे. मात्र 2007 सालापूर्वींच्या मिळकतींबाबत तत्कालीन आयुक्त अथवा सत्ताधाऱ्यांनी कोणताच निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे 2007 पूर्वीच्या मिळकतींना अतिशय नाममात्र मिळकतकर लागू आहे. त्याचशेजारी नव्याने उभारलेल्या मिळकतींना मात्र मोठा कर लागू आहे. एकाच परिसरात शेजारी-शेजारी असलेल्या मिळकतींच्या करामध्ये कमीत कमी 20 जास्तीत जास्त 50 पटींची तफावत आढळून येते. ही तफावत दूर केली जाणार आहे.

1 एप्रिल 2020 पासून सन 2007 पूर्वीच्या मिळकतींची तपासणी केली जाणार असून त्याचे करयोग्य मूल्य ठरविले जाणार आहे. सध्याच्या दराप्रमाणे मिळकतकर लागू केला जाणार असून हा मिळकतकर लागू करताना घसराही दिला जाणार आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही.

सर्वसाधारण सभेसमोर विषय
जुन्या मिळकतींची तपासणी व करयोग्य मूल्य ठरविण्याचा विषय सध्या सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी आहे. सर्वसाधारण सभेने मंजूर न केल्यास काय? या विषयावर बोलताना आयुक्त म्हणाले, मिळकतकर आम्ही वाढवित नसल्याने सर्वसाधारण सभेने हा विषय फेटाळला तरी तपासणी आणि सर्वेक्षण हे आयुक्तांचे अधिकार असल्याने आयुक्तांच्या अधिकारात या विषयाची अंमलबाजवणी केली जाईल. 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला असून जुन्या मिळकतींचे करयोग्य मूल्य ठरविण्याचा निर्णय आयुक्तांच्या अधिकारात राबविला जाईल, असेही आयुक्त म्हणाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.