करवाढीचा ठराव आता महासभेत

महापालिका स्थायी समितीचा ठराव; बायो-मिथेनेशन प्रकल्प तातडीने सुरू करणार

नगर – महापालिकेच्या बुरुडगाव येथील बायो-मिथेनेशन प्रकल्प तातडीने सुरू करावा, असा ठराव महापालिका स्थायी समितीच्या सभेत आज घेण्यात आला. पुण्यातील मेल हेम आयकॉस संस्थेला हा प्रकल्प उभारण्याचा ठेका देण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे शहरातील हॉटेलमधील कचरा व मटन शॉपीमधील कचऱ्यातून बायो-मिथेन गॅस तयार करण्यात येणार आहे.

तसेच महापालिकेच्या मालमत्ता करात दोन टक्‍के अग्निशमन कर वाढीच्या ठरावाला स्थायी समितीच्या सभेने मंजुरी दिली. आता हा ठराव पुढील मंजुरीसाठी महासभेकडे पाठविण्यात आला आहे. महासभेने याला मंजुरी दिल्यास शहरातील मालमत्ता करधारकांना दोन टक्‍के अधिक कर द्यावा लागणार आहे.

महापालिकेत आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सभापती मुदस्सर शेख, उपायुक्‍त सुनील पवार, डॉ. प्रदीप पठारे, नगरसेवक गणेश भोसले, कुमार वाकळे, अविनाश घुले, संध्या पवार, सोनाली चितळे, दीपाली बारस्कर, योगीराज गाडे, मनोज कोतकर, अमोल येवले, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. अनिल बोरगे, विद्युत विभाग प्रमुख कल्याण बल्लाळ, प्रकल्प विभाग प्रमुख राजेंद्र मेहेत्रे, अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ आदी उपस्थित होते.
मागील सभेत शहर पाणीपुरवठा फेज 2 अंतर्गत असलेल्या नळजोडणीच्या कामावर सुरुवातीला चर्चा झाली. हे काम ठेकेदाराकडून करण्यापेक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करून घ्यावे.

यात महापालिका प्रशासन व नळजोडणी घेणारे सामान्य नागरिक यांचे पैसे वाचतील, असे मत कुमार वाकळे यांनी मांडले. त्यास गणेश भोसले, अविनाश घुले, दीपाली बारस्कर यांनी सहमती दर्शविली. सर्वसामान्यांवर या कामाचा बोजा पडणार नाही याकडे लक्ष देण्याचे आदेश सभापती मुदस्सर शेख यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले. या शिवाय शहरातील घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी 64 टिपर गाड्या खरेदी करण्याच्या ठरावालाही मान्यता देण्यात आली.
मालमत्ताकरावर दोन टक्‍के अग्निशमन कर लावण्याच्या प्रस्तावावर कुमार वाकळे म्हणाले, की अग्निशमन विभागाचे कर्मचारी अप्रशिक्षित आहेत.

महापालिकेकडे पुरेसी साधनसामग्री नाही. अग्निशमन कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा साधने नसल्याबाबत त्यांनी ताशेरे ओढले. भोसले यांनी अग्निशमन विभागातील कर्मचारी बिगारी असल्याचे सांगितले. यावर वाकळे यांनी अग्निशमन विभाग नागरिकांच्या आयुष्याशी खेळत असल्याचा आरोप केला. तसेच तरुण व प्रशिक्षित कर्मचारी नियुक्‍त करावेत, वृक्षकराचे पैसे केवळ वृक्ष व उद्यानांवरच खर्च करावेत, अशी सूचना केली. यावर अग्निशमन विभागप्रमुख शंकर मिसाळ यांनी शहरातील काही अग्निशमन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्व कर्मचारी अनुभवी आहेत, असे स्पष्टीकरण दिले.

शहर स्वच्छतेबाबत अभिनंदनाचा ठराव
भारत सर्वेक्षण अभियाना अंतर्गत नगर शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली. यात सर्व जनता व महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे शहराचा चेहरा बदला आहे. असे म्हणत गणेश भोसले यांनी शहर स्वच्छता अभिनंदनाचा ठराव मांडला. याला दीपाली बारस्कर यांच्यासह सर्व उपस्थित नगरसेवकांनी सहमती दर्शविली. त्यानुसार सभापती शेख यांनी ठराव मंजूर केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.