परवानगीच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून करवसूली

दुकानांबाबत अजब धोरण; व्यावसायिकांनी व्यक्‍त केला संताप

पिंपरी(प्रतिनिधी) – सरकारला महसूल मिळावा, यासाठी विशेष विचार न करता शहरातील दारुची दुकाने सुरु करण्यात आली. परंतु इतर दुकाने सुरु करण्यासाठी मात्र विशेष तयारी केली जात आहे. विक्रेते आणि व्यावसायिकांना परवानगी देण्यासाठी अर्ज भरुन घेतले जात आहेत. या परवानगीच्या नावाखाली या बिकट परिस्थितीतही पिंपरी-चिंचवड महापालिका करवसुली करण्याचा दुर्दैवी प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.

गेल्या 45 दिवसांपासून व्यवसाय पूर्णपणे ठप्प असल्याने व्यापारी आणि व्यावसायिक वर्ग आर्थिक दृष्ट्या त्रस्त झाला आहे. पालिका काही ठराविक दुकाने उघडण्यास परवानगी देणार हे कळाल्यावर अनेक व्यावसायिकांनी समाधान व्यक्‍त केले होते. परंतु दुकान उघडण्यासाठी परवानगी देणाऱ्या अर्जासोबत जोडावयची कागदपत्रे पाहताच व्यावसायिकांना धक्‍का बसला आहे. महापालिका परवानगी देण्याच्या नावाखाली मार्च 2020 अखेरपर्यंतचा कर वसूल करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या दुकानदारांनी कर भरलेला नाही अशांना परवानगी नाकारली जात असल्याने व्यवसायिकांमधून संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.

पालिकेने आपल्या संकेतस्थळावर परवानगीसाठीचा अर्ज अपलोड केला आहे. हा अर्ज संबंधित क्षेत्रीय कार्यालयात जमा करायचा आहे. या अर्जासोबत तीन कागदपत्रे जोडण्यास सांगण्यात आली आहेत. त्यात शॉप ऍक्‍ट, उद्योग आधाराची झेरॉक्‍स आणि दुकानाचा मार्च-2020 अखेरपर्यंतचा कर भरला असल्याच्या पावतीची झेरॉक्‍स जोडण्यास सांगितले आहे. याचाच अर्थ की आता दुकान उघडण्यासाठी आधी दुकानदारांना पालिकेचा कर भरावा लागणार आहे.

गेले अनेक वर्षे शहरातील नागरिक शास्तीकराचा बोझ सहन करत आहेज. यामुळे कराची रक्‍कम फुगली आहे. गेल्या 45 दिवसांपासून व्यवसाय बंद असल्याने उत्पन्न ठप्प झाले आहे, परंतु अत्यावश्‍यकखर्च, कामगारांचे पगार सुरुच आहेत. यामुळे आधीच त्रासलेल्या व्यापारी वर्गाला महापालिकेने करासाठी वेठीस धरले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.