‘तौत्के’ वादळाने केरळात दाणादाण

कोची/नवी दिल्ली  – अरबी समुद्रातील तौत्के वादळाचा आज केरळच्या किनारावर्ती भागाला जोरदार तडाखा बसला. जोरदार पर्जन्यवृष्टी आणि सुसाट्याच्या वाऱ्याने या भागात दाणादाण उडवली.

दक्षिणेकडील तिरुवनंतपुरम्‌पासून उत्तरेकडील कासरगोडपर्यंत किनारावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांनी आपले घरदार सोडून राज्य सरकारने उभारलेल्या पुनर्वसन केंद्रात धाव घेतली. समुद्‍र्राला उधाण आल्याने त्यांना या वाचून पर्याय रहिला नव्हता. शनिवारी ताशी 50 ते 70 किमी प्रती तास वेगाने वारे केरळ आणि कर्नाटकच्या किनारावर्ती भागात वहात असल्याची नोंद वेधशाळेने केली.

किनारावर्ती भागातील कासरगोड, कन्नूर, कोझीकोडे, त्रिसूर, एर्नाकुलम, अल्पुझा यासारख्या भागात किनारावर्ती भागात असणाऱ्या शेकडो घरांचे नुकसान झाले. अनेक घरे अक्षरश: जमीनदोस्त झाली. एर्नाकुलम जिल्ह्यातील चेल्लनम गावात संरक्षण भिंत नसल्याने समुद्राचे उधाण गावांत घुसले. त्यामुळे ग्रामस्थांनी आपले गाव सोडून त्यांचे नातेवाईक अथवा पुनर्वसन केंद्राकडे धाव घेतली.

राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल आणि राज्य पोलिसांच्या पथकांनी मदतकार्य सुरू केले आहे. सध्याच्या करोनाच्या छायेत अधिकाऱ्यांनी करोना बाधितांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. मात्र तरीही करोनाच्या भीतीने अनेक जणांनी पुनर्वसन केंद्रात येण्याचे टाळले.

कोझीकोडे प्रशासनाला समुद्राला उधाण येण्यास सुरवात झाल्यानंतर बरपोरे, कोइलॅंडी, कडलुंडी आणि वडकरा येथील ग्रामस्थांना पुनर्वसन केंद्रात हलवावे लागले. मनमिला आणि अचनकोविल नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना राष्ट्रीय जल आयोगाने पूर येण्याची शक्‍यता असल्याने सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. कल्लपोरा आणि तुंबमॉन येथे या नद्यांच्या पाण्याची पातळी धोक्‍याच्या रेषेवर आल्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे.

कोझीकोडे, कोची आणि थिरूवनंतपुरम यासारख्या शहरात झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. गटारे आणि कालवे तुडूंब भरून वहात होते. अनेक झाडे आणि विजेचे खांब कोसळल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता. हा वीज पुरवठा आणि जनजीवन सुरळीत करण्यासाठी अग्नीशामक दल, राज्य आपत्कालीन पथक, पोलिस आणि वीज मंडळ युध्द पातळीवर कार्यरत होते.

इडुक्की जिल्ह्यात कलवरी येथील एका शाळेचे छत पावसाने कोसळले. कैपानी येथे नदीवर उभारलेला एक तात्पुरता पूल या पावसांत वाहून गेला. यापुर्वीचा पूल गेल्या वर्षी पावसाळ्यातील पुरात वाहून गेला होता. त्यानंतर हा तात्पुरता पूल बांधण्यात आला होता.
भूथाथांकेत्तू, कल्लरकुट्टी आणि मलनकारा या धराणात पाणीसाठा वाढल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.