‘तौक्ते’ : मुंबईत दोन तासात 132 झाडे पडली; सी-लिंक बंद

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईवर तौक्ते चक्रिवादळाचं संकट घोंघावत आहे. काल रात्रीपासून मुंबईसह किनारपट्टीच्या भागात जोरदार वारेवाहत असून पावसानेही दमदार हजेरी लावली आहे.

आज सकाळी मुंबईत अवघ्या दोन तासात 132 झाडे उन्मळून पडली आहेत. त्यावरून तौक्ते वादळाचा तडाखा किती मोठा आहे हे दिसून येते.

मुंबईत कालपासूनच जोराचे वारे वाहत असून पाऊसही पडत आहे. जोरदार वाऱ्यामुळे काल 16 मे रोजी मुंबईत 50 झाडे उन्मळून पडली. तर आज सकाळी 8 ते 10 या दोन तासात एकूण 132 झाडे कोसळून पडली आहेत. त्यात शहरात 59, पूर्व उपनगर 15 आणि पश्चिम उपनगरातील 58 झाडांचा समावेश आहे.

सुदैवाने झाड कोसळल्याने कोणतीही जिवीत वा वित्तहानी झाली नाही. तसेच कुणालाही मार लागला नसल्याचं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलवर आज एका झाडाची फांदी कोसळली. ओव्हरहेड वायरवर ही फांदी कोसळल्याने शॉर्ट सर्किट झाल्याने लगेचच धूर निघाला. त्यामुळे लोकल तात्काळ थांबवावी लागली.

परिणामी रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या घटनेमुळे कोणतीही जिवीत हानी झाली नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून झाड दूर केलं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.