मुंबई – अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवतो आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहेत. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे.
आणि याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे.
तसेच आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896 ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.