‘टॅटू, पिअर्सिंग’ एक मॉडर्न शृंगार! ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष; अन्यथा नंतर पडू शकते महागात

पुणे – सुंदर दिसणे, नटणे-थटणे आणि आकर्षक बनणे ही प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने, कपडे आणि इतर साधने वापरली जातात. काहीजण सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपचारांचा अवलंब करतात आणि काही पंचतारांकित सुविधांसह त्वचेवर उपचार घेतात. टॅटू आणि पिअर्सिंग किंवा छेदन हा फॅशनेबल बनण्याचाच एक भाग आहे. 

तसे पाहता आपल्या देशात अनेक वर्षांपासून आपल्या प्रियजनांची किंवा स्वतःची नावे टॅटूच्या स्वरूपात गोंदवण्याची परंपरा आहे. विशेषत: आदिवासी भागात आणि गावांमध्ये आजही नाव गोंदवण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे विविध पद्धतीचे दागिने घालण्यासाठी कान, नाक टोचून घेणे अथवा छेदन करणे हा देखील आपल्या परंपरेचा एक भाग आहे. 

सध्या काही आधुनिक तंत्रांनी नाव अथवा डिझाइन शरीरावर गोंदवून घेण्याची ही परंपरा “टॅटू’च्या रूपात ट्रेंड बनली आहे. आज “टॅटू’ आणि “पिअर्सिंग’ हे विशेषतः तरुणांच्या जीवनाचा एक भाग बनले आहे. प्रियजनांच्या नावांपासून ते प्राण्यांच्या चेहऱ्यापर्यंत तसेच काही सकारात्मक संदेशासह चित्रविचित्र संदेशांचेही टॅटू काढले जातात. 

काही लोक तर संपूर्ण शरीर टॅटूने सजवतात. भुवया, ओठ, नाभीवर पिअर्सिंग करण्याचा ट्रेंड आहे. किशोरवयीन आणि तरुणांमध्ये टॅटू आणि छेदन या दोन्ही गोष्टींबद्दल खूप क्रेझ आहे, परंतु टॅटूची शाई आणि सुयांमुळे संसर्ग होऊ शकतो. ज्या ठिकाणी टॅटू काढत आहात किंवा पिअर्सिंग करत आहात त्या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतली जाते का, याची खात्री करा.


पिअर्सिंग किंवा टॅटू काढणाऱ्या व्यक्‍तीचे त्यासाठी पुरेसे प्रशिक्षण आहे का, हे देखील महत्त्वाचे आहे. पिअर्सिंग करताना किंवा टॅटू बनवताना, सुया शरीराच्या अनेक मज्जातंतूंच्या संपर्कात येतात, म्हणून थोडीशी चूक देखील घातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, यामुळे अनेक महत्त्वाच्या आणि नाजूक अवयवांच्या कार्यावर परिणाम होण्याची भीती असते. 

म्हणून कपाळावर, डोळ्यांभोवती, ओठांवर, नाभीमध्ये, जिभेवर पिअर्सिंग अथवा टॅटू करण्यापूर्वी योग्य सल्ला घ्या. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ऍलर्जीचा त्रास होत असेल तर या दोन्ही गोष्टींमुळे हा धोका वाढू शकतो. टॅटू किंवा पिअर्सिंग यामुळे विविध प्रकारची ऍलर्जी होऊ शकते. टॅटूसाठी वापरले जाणारे रंग म्हणजे शाई, पिअर्सिंगसाठी वापरलेली धातूची साधने इत्यादीमुळे ऍलर्जी होऊ शकते. 

या साधनांमध्ये निकेल, निओबियम आणि टायटॅनियमचा समावेश असू शकतो. अनेक जीवघेणे विषाणू आणि जीवाणू आहेत ज्यामुळे टॅटू किंवा पिअर्सिंगने शरीरात संसर्ग होऊ शकतो. यामध्ये हिपॅटायटीस सारख्या रोगांचा समावेश आहे. जर पिअर्सिंग योग्य प्रकारे केले गेले नाही तर त्वचेवर हायपरट्रॉफिक चट्टे देखील येऊ शकतात. म्हणून फॅशन करा, मात्र सावधगिरी बाळगूनच!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.