मुंबई – वाढत असलेला तोटा कमी करण्यासाठी टाटा मोटर्स जॅग्वार लॅंड रोव्हर कंपनीतील भागभांडवल विकणार असल्याच्या वृत्ताचा टाटा मोटर्सने इन्कार केला आहे.
टाटा मोटर्समध्ये जॅग्वार लॅंड रोव्हरचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे या कंपनीतील भागभांडवल विकण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे टाटा मोटर्सने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. कंपनीची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याचा दावाही कंपनीने केला असून आगामी काळाबाबत कंपनी आशावादी असल्याचे म्हटले आहे.
कंपनीने दीर्घ पल्ल्याचा विचार करून संशोधन आणि विकासात मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे कोणत्याही कंपनीतील भागभांडवल कमी करण्याचा समूहाचा कसलाही विचार नसल्याचे टाटा समूहाने या अगोदरच सतपष्ट केले असल्याचे पत्रकात म्हटले आहे.