नवी दिल्ली – फोर्ड कंपनीचा सानंद येथील कारखाना खरेदी करण्याची प्रक्रिया चालू केली असून ही प्रक्रिया 10 जानेवारी रोजी पूर्ण होईल असे टाटा मोटर्सकडून सूचित करण्यात आले. ऑगस्ट महिन्यात टाटा मोटर्सने जाहीर केलेल्या माहितीनुसार टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी ही कंपनी सानंद येथील फोर्ड इंडियाचा कारखाना 725 कोटी रुपयांना खरेदी करणार होती. त्यामध्ये जमीन, इमारत आणि इमारतीमधील सर्व यंत्रसामग्रीचा समावेश आहे. फोर्ड मोटर्समधील सर्व कर्मचारी टाटा मोटर्स अंतर्गत काम करण्याची शक्यता आहे.
आता यासाठी आवश्यक त्या सर्व सरकारी परवानग्या मिळाल्या आहेत. सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या असून 10 जानेवारी रोजी हे हस्तांतरण पूर्ण होईल असे टाटा मोटर्सने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी या हस्तांतरणाला परवानगी दिली आहे. नव्या कंपनीमध्ये टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यात येणार आहेत. नव्या कारखान्यातून प्रत्येक वर्षाला तीन लाख कार तयार करण्याची क्षमता आहे.