मुंबई : टाटा मोटर्स कंपनीतील इलेक्ट्रिक वाहन विभाग असलेली टाटा डॉट ईव्ही ही कंपनी इतर कंपन्यांबरोबर सहकार्य करून देशात चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर देणार आहे. पुढील दोन वर्षांमध्ये चार लाख चार्जिंग पॉइंट उभारण्याचा संकल्प या कंपनीने जाहीर केला. त्यामुळे ईव्ही विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. यासाठी या कंपनीने ओपन 2.0 या मोहिमेची सुरुवात केली.
चार्जिंग पॉइंट ऑपरेटर्सबरोबर सहकार्य करून चार्जिंग पॉइंटची संख्या वाढविली जाणार असतानाच ही कंपनी 30 हजार नवे चार्जिंग पॉईंट्स उपलब्ध करणार आहे. या पॉईंट्सचा फायदा इतर कंपन्यांनाही होणार आहे. टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन व इलेक्ट्रिक वाहन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी सांगितले की, या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी आम्ही अनेक कंपन्याबरोबर सहकार्य करार केला आहे.
त्यामुळे देशातील चार्जिंग पायाभूत क्षेत्र जागतिक दर्जाचे होण्यास मदत होईल. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढून उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. या पायाभूत सुविधाचा ग्राहकांना वापर करता यावास यासाठी चार्जिंग हेल्पलाइन आणि पेमेंट सोल्युशन तयार करण्यात आले आहेत. देशात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढावी आणि यासाठीच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी 2019 पासून टाटा डॉट ईव्ही प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.