कराड – राज्यावर आलेले करोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. राज्यात रुग्णांची संख्या वाढतच आहे. करोना विषाणूच्या आपत्तीवेळी सरकारच्या बरोबरीने कॉंग्रेस पक्षही सर्व प्रकारची मदत करत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने आता करोना विरोधातील लढाईसाठी टास्कफोर्स घोषणा केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 18 सदस्यांच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून ज्येष्ठ अर्थतज्ञ माजी खासदार भालचंद्र मुणगेकर हे समन्वयक आहेत.
राज्य सरकारला मदत कार्यात सहकार्य करणे, आवश्यकता असेल तेथे सूचना व मार्गदर्शन करणे, कॉंग्रेसच्यावतीने सुरु असलेले मदतकार्य गतिमान करणे, सरकारला करोनाच्या लढ्यात मदत करणे. ऑडिओ व व्हिडिओ कॉन्फरन्स आदी माध्यमातून ही टास्क फोर्स कार्यरत आहे. समितीमध्ये खा. राजीव सातव, एकनाथ गायकवाड, माणिकराव ठाकरे, बसवराज पाटील, मुजफ्फर हुसेन, नसीम खान, विलास मुततेमवर, सुशीबेन शहा, चंद्र्कांत हांडोरे, आ. संग्राम थोपटे, आ. रणजीत कांबळे, कल्याण काळे, प्रदेश गणेश पाटील, चारुलता टोकस, सत्यजित तांबे, डॉ. अमोल देशमुख यांचा समावेश करण्यात आला आहे.