लंडन – ब्रिटनमध्ये करोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी लस शोधण्याचे प्रयत्न सुरू असतानाच या प्राणघातक विषाणूची लस शोधण्यासाठी, तसेच लस विकसित झाल्यावर तिचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी ब्रिटनने टास्क फोर्स स्थापन केला आहे. ब्रिटनचे व्यापार मंत्री आलोक शर्मा यांनी ही माहिती दिली. सरकारचे प्रमुख विज्ञान सल्लागार सर पॅट्रिक व्हॅलन्स या टास्क फोर्सचे प्रमुख असणार आहेत. व्यवसाय, उद्योग आणि संशोधन क्षेत्राशी हा टास्क फोर्स समन्वय साधणार आहे.
करोना विषाणूवर लस शोधण्याच्या प्रयत्नांचा समन्वय साधण्यासाठी हा टास्क फोर्स कार्यरत राहणार आहे. उद्योग आणि संशोधन संस्थांना आवश्यक पाठिंबा देणे, नियमांचा आढावा घेणे, तसेच लसीचे उत्पादनातील अडथळे दूर करण्याचे कामही टास्क फोर्स करणार आहे. लस कधी तयार होईल याची तारीख आम्हाला सांगता येणार नाही. मात्र, आपण अशा देशात राहतो ज्याला विज्ञानाचा इतिहास आहे. संशोधकांना सरकारचा पाठिंबा आहे, असे शर्मा यांनी सांगितले. सरकारकडून एक कोटी 40 लाख पौंडांची मदत दिली जाणारे 21 नवे संशोधन प्रकल्पही त्यांनी जाहीर केले. उपचार आणि लसनिर्मितीसाठी या प्रकल्पांद्वारे काम केले जाणार आहे.
राणीचा वाढदिवस होणार साधेपणाने
राणी एलिझाबेथ यांनी 21 एप्रिल रोजी आपल्या 94 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित असलेले सर्व पारंपरिक कार्यक्रम रद्द केले आहेत, अशी माहिती बकिंगहॅम पॅलेसतर्फे जाहीर करण्यात आली. सामूहिक संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. राणी एलिझाबेथ यांना वाढदिवसाच्या दिवशी देशभरातील रॉयल पार्क मधून गन सॅल्यूट देण्यात येते. मात्र, त्यांच्या 68 वर्षांच्या कारकीर्दीत प्रथमच त्यांना अशा पद्धतीने मानवंदना देण्यात येणार नाही. यंदा फक्त सोशल मीडियावरून त्यांना शुभेच्छा देण्यात येणार आहेत.