पुणे – करोनाची संभाव्य तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असल्याचा दावा करण्यात येत आहे. ती शक्यता गृहित धरून केंद्र सरकार ते स्थानिक स्वराज्य संस्थांनी “टास्क फोर्स’ तयार केला आहे. याद्वारे अनेक उपाययोजना सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाचा टास्कफोर्स हा वाड्या, वस्त्या, छोटी गावे, दुर्गम भागातील वस्त्या येथे जनजागृती करणार आहे. याशिवाय अंगणवाडीसेविका, आशा वर्कर्सना ही परिस्थिती हाताळण्यासाठी ट्रेनिंग दिले जाणार आहे.
करोना तिसरी लाट विषयाबाबत दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या संदर्भातील गाइडलाइन्स तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार डॉक्टरांना प्रशिक्षण देणे सुरू आहे. मात्र, आशा वर्कर्स, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, नर्स, अंगणवाडीसेविका यांनाही प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
त्यामुळे “माइल्ड’, “मॉडरेट’ आणि “सिव्हियर’ असे तीन टप्पे करण्यात आले आहेत. अगदी प्राथमिक म्हणजे “माइल्ड’ टप्प्यातील असेल, तर त्याच्यावर घरी कसे उपचार करायचे? “मॉडरेट’ असेल तर कोणते प्राथमिक उपचार करायचे आणि “सिव्हियर’ स्टेज असेल तर त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत ऍम्ब्युलन्स आणि अन्य सपोर्ट कसा द्यायचा. तसेच आजारपणातील आहार, समुपदेशनही महत्त्वाचे आहे.
जड अन्न खाऊ नये, काय खावे-प्यावे याची माहिती, तसेच मुले आजारपणात चिडचिडी होतात. शाळा बंद, लॉकडाऊन, सतत घरात त्यामुळेही मुलांमध्ये चिडचिड होते. त्यामुळे त्यांचे समुपदेशनही महत्त्वाचे असते. त्या अनुषंगानेही ट्रेनिंग दिले जाईल.
आशा वर्कर्स, अंगणवाडीसेविकांना समजाव्यात अशा गाइडलाइन्स मराठीत तयार केल्या आहेत. आरोग्य विभागाकडून त्या मंजूर होताच, प्रसारित करण्यात येईल आणि हे ट्रेनिंग सुरू करण्यात येईल. वेबिनारच्या माध्यमातून हे ट्रेनिंग दिले जाणार आहे. डॉक्टरांचे सात ते आठ वेबिनार झाले आहे. ते सर्व जिल्हा स्तरावर त्यांच्या भागात जाऊन पुढच्या फळीला प्रशिक्षित करतील. ऍम्ब्युलन्समधील डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडीसेविका आणि आशा वर्कर्स, नर्स यांना ते ट्रेनिंग देतील.
– डॉ. आरती किणीकर, टास्कफोर्स सदस्य