बारामती -बारामती नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी तरन्नुम आलताफ सय्यद यांची एकमताने निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार तरन्नुम सय्यद यांचा एकमेव अर्ज उपनगराध्यक्ष पदासाठी दाखल करण्यात आला. मुस्लीम समाजातील महिलेस उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाल्याने मुस्लीम समाजात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, ऐन महिला दिनाच्या काही दिवस अगोदर एका महिलेला उच्चपद मिळाल्याने महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ यांनी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची गर्दी होती. असले तरी अजित पवार यांनी सय्यद यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन त्यांना उपनगराध्यक्ष पदासाठी संधी दिली. तरन्नुम सय्यद या स्थापत्य अभियंता (सिव्हील इंजिनिअर) आहेत. प्रभाग क्रमांक 19मधून नगरसेविका म्हणून त्या कामकाज पाहत आहेत. आरोग्य सभापती पदावर त्यांनी काम केले आहे.
सिव्हिल इंजिनिअर असल्याचा फायदा बारामती नगर परिषदेतील बांधकाम विभागास होणार आहे. बांधकाम क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय घेत असताना त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल या उद्देशाने उपमुख्यमंत्री पवार यांनी तरन्नुम सय्यद यांची निवड केल्याचे दिसून येत आहे. तर एकता महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना रोजगाराची दिशा दिली आहे.
निवड प्रक्रियेवेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव,माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, शहराध्यक्ष इम्तियाज शीकीलकर, नगरसेवक सुनील सस्ते, गणेश सोनवणे, संतोष जगताप, कुंदन लालबिगे, सुरज महिला बालकल्याण सभापती डॉ.सुहासीनी सातव, अनिता माने, सीमा चिंचकर, अनिता जगताप, मुख्यधिकारी योगेश कडूसकर, नगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बारामती नगरपरिषदेमध्ये मुस्लीम महिला नगरसेविकेस उपनगराध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सामाजिक जाणिवेतून ही संधी मिळाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्ष पदावर काम करत असताना शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न राहील.
रस्ते, वीज, पाणी यासह नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या मूलभूत तसेच विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी मी तत्पर असेन. विकासाच्या माध्यमातून मुस्लीम समाजातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी देखील प्रयत्न केले जातील.
– तरन्नुम सय्यद, उपनगराध्यक्षा, बारामती नगरपरिषद