जागा वाटपातील विलंब ‘भोवला’ – तारीक अन्वर यांचा दावा

नवी दिल्ली – बिहार मध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत महागठबंधनाला अपेक्षित यश मिळू शकले नाही, याचे एक प्रमुख कारण म्हणजे या आघाडीचे जागा वाटप जाहीर करण्यास मोठाच विलंब झाला हे आहे, असे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते तारीक अन्वर यांनी म्हटले आहे.

या प्रकरणातून कॉंग्रेसने आता धडा घेतला पाहिजे आणि अन्य राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये हा प्रकार टाळला पाहिजे अशी सुचना त्यांनी केली आहे. तारीक अन्वर हे कॉंग्रेसचे सरचिटणीस आहेत आणि ते बिहार मधील पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत.

ते म्हणाले की या निवडणूक निकालाचे कॉंग्रेसच्या सर्वोच्च पातळीवर विश्‍लेषण केले जाईल. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या निवडणूकीत कॉंग्रेसला अपेक्षित यश न मिळणे हा आम्हाला मोठाच धक्का होता हे त्यांनी मान्य केले.

70 जागा लढवूनही कॉंग्रेसला तेथे केवळ 19 जागा जिंकता आल्या आहेत. आम्ही तेथे किमान 50 टक्के जागा जिंकणे अपेक्षित होते असे ते म्हणाले. आगामी काळात महागठबंधन अधिक मजबूत ठेवणे हेच आमचे धोरण राहील असे त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.

निवडणूक काळात कॉंग्रेस श्रेष्ठींकडून आम्हाला सर्व मदत व सहकार्य मिळाले असेही त्यांनी यावेळी नमूद केले. या निवडणूकीत आमच्याकडून ज्या चुका झाल्या त्याचे अवलोकन केले जाईल आणि त्याची पुनरावृत्ती टाळली जाईल असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.