श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका बिगर स्थानिक मजुराची हत्या केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदीपोरा येथील हाजिन भागातील सदनारा गावात 19 वर्षीय गैर-स्थानिक मजूर मोहम्मद अमरेजवर दुपारी 1 वाजता दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यानंतर स्थानिक डॉक्टरांनी त्याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, बेमिना, श्रीनगर येथे उपचारासाठी पाठवले मात्र यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो बिहारचा रहिवासी होता.
दरम्यान, लष्कराने परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम राबवली जात आहे. शुक्रवारी सकाळी म्हणजे आज काश्मीर झोन पोलिसांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘काल रात्री दहशतवाद्यांनी बांदीपोरा येथे बाहेरील मजूर मोहम्मद अमरेज यांच्यावर गोळीबार केला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.’
गुरुवारी राजौरी येथे झालेल्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात लष्कराचे तीन जवान शहीद झाले होते. तर दोन दहशतवादी मारले गेले. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी दहशतवाद्यांनी ही घटना घडवून आणली. गुरुवारी सकाळी सुभेदार राजेंद्र प्रसाद, रायफलमन मनोज कुमार आणि रायफलमॅन लक्ष्मण डी हे दहशतवादी कारवाईत शहीद झाले. मात्र, जवानांनी तळावरील आत्मघाती बॉम्ब हल्ला हाणून पाडला आणि दोन्ही दहशतवाद्यांना ठार केले.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी सातत्याने गैर-काश्मिरींना लक्ष्य करत आहेत. यापूर्वी एप्रिलमध्ये काकरन भागात दहशतवाद्यांनी एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केली होती. सतीश सिंग राजपूत असे या व्यक्तीचे नाव आहे. दहशतवादी संघटना गैर-काश्मीरींना खोरे सोडण्याचा इशारा देत आहेत. काश्मिरी पंडितांना खोरे सोडण्याची धमकी दिली जात आहे.