पिंपरी – समाजामध्ये जे चुकीचे काम करतात त्यांनाच टार्गेट दिले जाते. पिंपरी चिंचवड शहर भयमुक्त करणे, हेच आमचे टार्गेट असल्याचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सोमवारी (दि. 22) पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक निरीक्षक सचिन वाजे यांना दरमहा 100 कोटींचे टार्गेट दिले होते. याबाबत पत्रकार परिषदेनंतर तुमचे टार्गेट काय आहे, असे पत्रकारांनी विचारले असता त्यावर ते बोलत होते.
यावेळी बोलताना आयुक्त म्हणाले, चुकीचे कामे करणाऱ्या व्यक्तींना अशा प्रकारची टार्गेट दिली जातात. आणि सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला पोलीस आयुक्ताच्या परवागीशिवाय असे टार्गेट दिले जाऊ शकत नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे 100 कोटींच्या टार्गेटबाबतच्या आरोपात मला तथ्य वाटत नाही, असेही ते म्हणाले.
‘ती’ पत्रे मिळालीच नाहीत
पिंपरी चिंचवड शहरातील अवैध धंद्यातून वसुलीबाबतची पत्र व्हायरल झाली होती. याबाबतचा तपास आपल्याकडे नाही, यामुळे त्यावर भाष्य करणार नाही, असे म्हणून शहरातील वसुलीबाबतच्या पत्र प्रकरणाला त्यांनी बगल दिली. मात्र, शहरात कोणाचीही दादागिरी पोलीस खपवून घेणार नाही. गुन्हेगार हा कोणत्याही पक्षाचा असला तरी आमचा त्याच्याशी संबंध नाही. कारण तो आमच्यासाठी फक्त गुन्हेगार असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.