अबाऊट टर्न: तारे जमींपर!

हिमांशू

रिक्षा आणि ट्रॅक्‍टर ही दोन्ही तशी अवघड वाहनं. एअर कन्डिशन्ड कार चालवण्याइतकं सोपं नसतं रिक्षा चालवणं. ट्रॅक्‍टर चालवणं म्हणजे तर साक्षात रणगाडा चालवणं! पण ही दोन्ही वाहनं चक्‍क सेलिब्रिटींनी चालवल्याचं नुकतंच पाहायला मिळालं. ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांनी ट्रॅक्‍टर चालवला, तोसुद्धा शेतात जाऊन! नशीब, त्या ट्रॅक्‍टरला भरलेल्या ट्रॉली जोडलेल्या नव्हत्या. कारण उसानं भरलेल्या ट्रॉली ट्रॅक्‍टरच्या साह्यानं शेतातून बाहेर काढताना ट्रॅक्‍टरची पुढची चाकं उचलली जातात, हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय. हेमा मालिनी यांनी ट्रॅक्‍टर किती वेळ चालवला आणि त्या शेताचं स्वरूप कसं होतं, याचा फारसा तपशील समजू शकला नाही. परंतु दोनच दिवस आधी त्यांनी गव्हाच्या शेतात जाऊन हातात विळा घेतला आणि गव्हाची कापणीही केली. या देशात शेती आणि शेतकऱ्यांचं महत्त्व अचानक एवढं कसं काय वाढलं, असा प्रश्‍न पडल्यावाचून राहिला नाही.

हेमा मालिनी आपल्या मोटारीतून निघाल्या होत्या (अर्थातच प्रचाराला) आणि त्यांना सोनेरी रंगाचं गव्हाचं भरघोस पीक दिसलं. कापणी सुरू होती. बायाबापड्या हातात विळा घेऊन सपासप उभं पीक आडवं करीत होत्या. हे दृश्‍य पाहून आपल्याला राहवलं नाही. धावत जाऊन आपण विळा हातात घेतला आणि कापणी सुरू केली, असं हेमा मालिनी यांनी सांगितलं.

म्हणजे, सगळं काही अचानक घडून आलं होतं. तरीही दोन महत्त्वाचे प्रश्‍न डोक्‍यात आलेच! एक म्हणजे, हे दृश्‍य हेमा मालिनी यांनी पूर्वी खरोखर कधीच पाहिलं नव्हतं? अनेकदा त्या मोटारीतून जाताना त्यांना शेतं दिसली असतील; शेतकरीही दिसले असतील. हातात विळा घ्यावा, असं आताच का वाटलं, असा पहिला प्रश्‍न. दुसरा प्रश्‍न असा की, जर हे अचानक घडलं तर लगेच टीव्हीवर कसं काय दिसलं? अर्थात, हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाइल फोन आहेत, त्यात कॅमेरे आहेत. शूटिंग करण्यासाठी टीव्हीवाल्यांचे कॅमेरेच बोलावले पाहिजेत, अशी गरज राहिलेली नाही. परंतु कुणाच्यातरी मोबाइलमध्ये बंदिस्त झालेली ही दृश्‍यं टीव्ही चॅनेलवाल्यांकडे पोहोचवण्यासाठी थोडीफार यंत्रणा असणं अपेक्षित असतंच की! गव्हाची कापणी असो किंवा ट्रॅक्‍टर चालवणं असो, ही दृश्‍यं टीव्हीवर दिसू लागली, हे महत्त्वाचं! जी गोष्ट ट्रॅक्‍टरची, तीच रिक्षाची.

ऊर्मिला मातोंडकर यांच्यासारख्या सेलिब्रिटीला रिक्षात मागे बसण्याचीही वेळ बऱ्याच वर्षांत आली नसेल. पण आता त्या रिक्षा चालवताना दिसू लागल्या. रिक्षा स्टॉपवर जाऊन मोठ्या आवाजात त्यांनी रिक्षावाल्यांशी संवाद साधला. अशी कल्पना करून पाहू की, मातोंडकर यांना शूटिंगला उशीर होतोय आणि मुंबईच्या रस्त्यावर ट्रॅफिकचा नेहमीसारखा खोळंबा झालाय… …अशा वेळी सेलिब्रिटींची पहिली प्रतिक्रिया काय असते? जाम झालेल्या ट्रॅफिकमध्ये समजा रिक्षांचीच संख्या जास्त आहे आणि मातोंडकर यांची गाडी अडकून पडली आहे… याप्रसंगी रिक्षा आणि रिक्षावाले मातोंडकरांना इतके जवळचे वाटले असतील? पण, एकेकाची वेळ असते! मराठमोळ्या मातोंडकरांनी पाडव्याला लेझीम खेळून आपलं मराठीपणही न चुकता दाखवलं. तात्पर्य, स्वतःला समाजापासून शक्‍य तेवढं वेगळं ठेवतात, ते सेलिब्रिटी आणि समाजाच्या शक्‍य तेवढं जवळ जाण्याचा प्रयत्न करतात, ते नेते!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.